General knowledge: जगातील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम आणि कायदे आहेत, जसे गाडी चालवताना वाहतुकीचे नियम आहेत. त्याचप्रमाणे विमान प्रवासासाठीही काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांचे प्रमाण वाढले आहे.यामुळे विमानाला अपघात झाल्यास नुकसान भरपाई कंपनी देते की सरकार? यासारखी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल जेजू एअरचे विमान कोसळले. या अपघातात १७९ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर लगेच कॅनडात विमान अपघाताची घटना घडली. या दोन्ही घटनेच्या आधी २५ डिसेंबर रोजी अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले, ज्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. आता प्रश्न असा निर्माण होत आहे की, या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना नुकसानभरपाई कशी दिली जाते? ज्या ठिकाणी अपघात झाला तेथील सरकार प्रवाशांना भरपाई देते की विमान कंपनी देते? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
देशांतर्गत उड्डाणे चालवण्यासाठी विमान वाहतूक मंत्रालय नियम आणि कायदे ठरवते. हवाई वाहतूक मंत्रालयाने २०१४ मध्ये एक अधिसूचना जारी केली होती. या अंतर्गत, विमानाचा कोणताही अपघात झाल्यास, विमान कंपनी प्रवाशांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देते. मात्र, हा नियम केवळ देशांतर्गत उड्डाणांसाठी लागू आहे.
पॅसेंजर चार्टरनुसार, आंतरराष्ट्रीय विमान अपघात झाला तरी भरपाई देण्याची तरतूद आहे. अपघात झाल्यास प्रवाशाच्या कुटुंबाला एअरलाइन कंपनीकडून १ लाख १३ हजार १०० एसडीआर दिले जाते. याआधी नुकसान भरपाई म्हणून १ लाख रुपये दिले जायचे. परंतु, २०१६ मध्ये यात वाढ करण्यात आली.
एसडीआरला जागतिक चलन परिवर्तक मानू शकता. एक एसडीआर अमेरिकेच्या १.४१ डॉलर बरोबर आहे. विमान कंपनीला अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दीड कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई मिळते.
महत्त्वाचे म्हणजे, सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या सर्व उड्डाणांचा विमा काढणे आवश्यक आहे. कुठलाही अपघात झाला तर, येथून पैसे येतात. अपघात झाल्यास विमा कंपनी संपूर्ण नुकसान भरपाई देते. त्यासाठी प्रवाशांना वेगळे काही करावे लागत नाही.