Ola and Uber fare issue : आयफोन आणि अँड्रॉइड फोन धारकांना ओला आणि उबेर वेगवेगळे भाडे आकारारन भेदभाव करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपन्या करत असलेल्या या भेदभावामुळे केंद्र सरकारने या दोन्ही कंपन्यांना नोटिस पाठवली असून या बाबत जाब विचारला आहे.
विविध मॉडेल्सच्या मोबाइलफोनवर ओला आणि उबेर या कंपन्या वेगवेगळे भाडे आकारत असल्याने या दोन्ही कॅब सर्विस देणाऱ्या कंपन्यांना सरकारने नोटीस बजावली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून या बाबत माहिती दिली. जोशी म्हणाले, कॅब कंपन्या या आयफोन आणि अँड्रॉइडवर मोबाइल फोनवर वेगवेगळे भाडे आकारत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी मंत्रालयाकडे आल्या होत्या.
जोशी म्हणाले, 'विविध मोबाइल मॉडेल्सच्या (आयफोन/अँड्रॉइड) आधारे या कंपन्यांच्या भाड्यात तफावत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर कारवाई करत ग्राहक व्यवहार विभागाने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणामार्फत (सीसीपीए) ओला आणि उबरसारख्या प्रमुख कॅब कंपन्यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. "
मोबाइल फोनच्या मॉडेलच्या आधारे भाड्यात मोठ्या प्रमाणात तफावत केली जात होती. या बाबत सतत्या तपासून घेण्यासाठी सरकारने दोन्ही कंपन्यांना नोटिस बजावली होती. यात जर तथ्य असेल तर ते ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन ठरू शकते. अलीकडच्या काळात आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना समान अंतरासाठी वेगवेगळे भाडे दाखवले जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली होती. ओला आणि उबरचे अल्गोरिदम ग्राहकांच्या फोन मॉडेलचे विश्लेषण करून त्यांच्या पैसे देण्याच्या क्षमतेनुसार भाडे ठरवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. समजा आयफोन आणि अँड्रॉइड हे दोन्ही स्मार्टफोन आहेत. त्यांच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये फरक आहे. आयफोन अॅपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात, तर अँड्रॉइड फोन गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालवतात.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीत आरोप खरे आढळल्यास या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अद्याप ओला आणि उबरकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट केली जाईल.
संबंधित बातम्या