CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला? ‘ती’ एक चूक महागात पडली! अहवालातून माहिती समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला? ‘ती’ एक चूक महागात पडली! अहवालातून माहिती समोर

CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला? ‘ती’ एक चूक महागात पडली! अहवालातून माहिती समोर

Dec 20, 2024 11:26 AM IST

How CDS General Bipin Rawat Helicopter Crash : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा ८ डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कासा झाला या बाबत महत्वाची माहिती पुढे आली आहे.

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला ? ‘ती’ चूक महागात; अहवालात महत्त्वाची माहिती आली समोर
सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला ? ‘ती’ चूक महागात; अहवालात महत्त्वाची माहिती आली समोर

How CDS General Bipin Rawat Helicopter Crash : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा ८ डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.  तमिळनाडू येथील कुन्नूर परिसरात त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.  या घटनेत  बिपीन रावत यांच्या पत्नीसह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. बिपीन रावत हे देशाचे सीडीएस असल्याने संरक्षण क्षेत्रातील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा मृत्यू कसा झाला? याबाबत संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, त्यांच्या या अपघाता बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.  हवामानात अचानक बदल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज अपघातानंतर व्यक्त करण्यात आला होता.

तामिळनाडूतील कुन्नूर येथे  एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत इतर १३  जणांच्या मृत्यू झाला होता. या अपघाताविषयी  एक महत्त्वपूर्ण अहवाल समोर आला आहे. संसदेच्या संरक्षण विषयक स्थायी समितीच्या ताज्या अहवालात हेलिकॉप्टर दुर्घटनेची कारणे समोर आली आहे. हा अहवाल संसदेत सादर करण्यात आला आहे. मानवी त्रुटीमुळे अर्थात एअर क्रू मेंबरच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतीय वायूदलानं पुरवलेल्या माहितीच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

काय आहे अहवालात ? 

जानेवारी २०२२ मध्ये भारतीय हवाई दलाने या अपघाताचे कारण पायलटने  खराब हवामानात केलेली चूक असल्याचं म्हटलं आहे. हवाई दलाच्या तपासात निष्काळजीपणा, हेलिकॉटरमध्ये झालेला  बिघाड किंवा कट रचणे हे अपघाताचे कारण असल्याचे नसल्याचे त्यावेळी नाकारले  होते. मात्र, तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त तपासाच्या म्हणजेच ट्राय-सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या प्राथमिक अहवालात  पायलटच्या चुकीमुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले, असल्याचे निष्पन्न झाले आहे.   स्थायी समितीच्या अहवालात २०१७-२२ दरम्यान ३४ विमान अपघातांच्या कारणांची माहिती देण्यात आली आहे. या अपघातांमध्ये एअरक्रू, सर्व्हिसिंग, तांत्रिक बिघाड, परदेशी वस्तूंचे नुकसान आणि पक्ष्यांचा मुळे झालेले अपघात  यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील काही अपघातांचा तपास अद्याप सुरू आहे.

८  डिसेंबर २०२१  रोजी एमआय-१७ व्ही ५  हेलिकॉप्टरचा  अपघात हा मानवी चुकांमुळे (एअरक्रू) झाला होता, असे अहवालात म्हटले आहे. रशियन बनावटीचे हे हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह मानले जात होते. हे  हेलिकॉप्टर कमी उंचीवर उडत होते आणि अपघाताच्या काही क्षणापूर्वी  येथील हवामानात मोठा बदल झाला होता. हेलिकॉप्टर उतरण्याच्या अवघ्या सात मिनिटे आधी हा भीषण अपघात झाला.  या  हेलिकॉप्टरने  सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी सुलूर हवाई तळावरून उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी गोल्फ कोर्सवर उतरणार होते. मात्र, दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला व थोड्याच वेळात रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.

जनरल बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका राजे सिंह रावत, त्यांचे संरक्षण सहाय्यक ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान, हेलिकॉप्टरचे पायलट स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह, को-पायलट ज्युनिअर वॉरंट ऑफिसर राणा प्रताप दास, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर अरक्कल प्रदीप, हवालदार सतपाल राय, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार आणि लान्स नायक बी साई तेजा यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. या अहवालात इतर हवाई अपघातांच्या कारणांचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर