BJP govt without Nitish Kumar : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिलेलं नाही. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला २४० जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता स्थापनेसाठी या पक्षाला नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांची मदत लागणार आहे. त्यामुळं निकाल जाहीर झाल्यापासून उलटसुलट चर्चा सुरू आहे. नितीशकुमार हे भाजपला सोडू शकतात असंही बोललं जात आहे. मात्र तसं झालं तरी भाजप केंद्रात सत्ता स्थापन करू शकत असल्याचं बोललं जात आहे.
निकाल लागल्यापासून इंडिया आघाडीचे नेते सत्ता स्थापनेसाठी सक्रिय झाले आहेत. इंडिया आघाडीपासून दूर गेलेल्या नितीश यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी निकराचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून होत आहे. नितीश कुमार यांच्यावर त्यांची भिस्त आहे. नितीश कुमार यांनी अनेकदा राजकीय मित्र बदलले आहेत. त्यामुळं तो कोणताही निर्णय घेऊ शकतात, असं बोललं जात आहे. आज सकाळी पाटण्याहून दिल्लीला आलेल्या विस्तारा फ्लाइटमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिसल्यानं संशय वाढला आहे.
नितीशकुमार NDA ऐवजी INDIA Alliance सोबत गेल्यास मोदी सरकारचं काय होईल याचीही चर्चा सुरू झाली आहे. नितीश यांना १२ जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमार एनडीएसाठी महत्त्वपूर्ण आहेत हे खरं आहे, मात्र त्यांनी वेगळा निर्णय घेतला तरी भाजपला सत्ता स्थापन करणं कठीण जाणार नाही.
भाजप आणि मित्र पक्षांना एकूण २९४ जागा मिळाल्या आहेत. त्यातील नितीश यांच्या १२ जागा कमी केल्या तरी २८२ जागा उरतात. बहुमतासाठी २७२ जागांची गरज आहे. त्यामुळं नितीश यांच्या जाण्याचा भाजपला फारसा फरक पडणार नाही. याचं उत्तर पुढील आकडेमोडीत आहे.
भाजपला स्वत:च्या २४० जागा मिळाल्या आहेत. त्यात चंद्राबाबू नायडू यांच्या १६ मिळवल्यास २५६ जागा होतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं ७ खासदार आहेत. स्वत:ला मोदींचे हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग पासवान यांच्या पक्षाचे ५ खासदार निवडून आले आहेत. आंध्रच्या जनसेनेला २ तर जयंत चौधरी यांच्या आरएलडीकडेही दोन जागा आहेत. या सगळ्याची बेरीज केल्यास २७२ आकडा होतो.
बहुमताचा आकडा २७२ आहे. अपना दल, अजित पवार यांची राष्ट्रवादी, अकाली दल, जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तान आवाम मोर्चा (HAM) आणि आसाममधील भाजपचा मित्रपक्ष आसाम गण परिषद या प्रत्येक पक्षाचा एक खासदार निवडून आला आहे. या सर्वांची साथ मिळाल्यास एनडीएकडं एकूण २७७ जागा होतात. हा आकडा बहुमतापेक्षा ५ ने जास्त आहे.
संबंधित बातम्या