Bihar News in Marathi : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस होण्याची स्वप्नं पाहणारी मुलं वर्षानुवर्षे प्रयत्न करत असतात. कुटुंबापासून दूर राहून, पोटाला चिमटा काढून अभ्यास करतात. यातील सर्वांचीच स्वप्नं पूर्ण होतात असं नाही. मात्र, बिहारमधील एका १८ वर्षीय तरुणानं यातलं काहीही न करता दोन लाख रुपयांच्या बदल्यात आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिथिलेश कुमार असं या 'उद्योगी' तरुणाचं नाव आहे. हा पठ्ठ्या कसलीही परीक्षा न देता दोन लाख रुपये देऊन 'अधिकृत गणवेश' आणि पिस्तूल मिळवून आयपीएस अधिकारी म्हणून मिरवत होता. नॅशनल क्राइम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या (NCIB) अधिकृत एक्स हँडलवरून मिथिलेश कुमारचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात तो गणवेशात दिसत आहे.
बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे. मनोज सिंह नावाच्या व्यक्तीनं मिथिलेशला आयपीएस बनवण्याचं आमिष दाखवलं आणि दोन लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केली. मनोज सिंह एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं मिथिलेश कुमारला पूर्ण युनिफॉर्ममध्ये स्थानिक पोलिस ठाण्यात पाठवलं.
पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी जेव्हा मिथिलेशला पाहिलं. त्यांनीही गमतीनं त्याचं स्वागत केलं. ‘या, आयपीएस सर!’ सिकंदरा पोलीस ठाण्यात तुमचं स्वागत आहे, असं तिथले अधिकारी म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी घडलेल्या घटनेबद्दल तरुणाकडून सर्व माहिती घेतली.
ही पोस्ट २० सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून या व्हिडिओला १.१ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या शेअरला असंख्य लाईक्स आणि कमेंट्सही आहेत. अनेकांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
‘कसे-कसे लोक जगात आहेत. या मुलाला मूर्ख बनवलं गेलं आहे, हे त्याला अजूनही समजलेलं नाही,’ असं एकानं म्हटलं आहे.
'ज्यानं या मुलाची फसवणूक केली आहे, त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया अजय जांगीर नावाच्या आणखी एका एक्स युजरनं दिली आहे.
या मुलावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये, तो निष्पाप आणि भोळा मुलगा आहे, मनोज सिंगवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी पोस्ट एक्स युजर अजित नांदल यांनी केली आहे.
‘पोलिसांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. बिचाऱ्याला काही वेळ खऱ्या आयपीएससारखं वाटलं असावं,’ असं एका युजरनं म्हटलं आहे.