वायव्य तुर्किये (तुर्की) येथील स्की रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ६६ जणांचा मृत्यू झाला असून ५१ जण जखमी झाले आहेत. ही घटना कार्तलकाया मधील बोलू प्रांतातील एका हॉटेलमध्ये घडली. तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सांगितले की, रेस्टॉरंटमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक तास आग विझवण्यासाठी धडपड करावी लागली. त्यांनी सांगितले की, आम्ही अत्यंत दु:खात आहोत. या दुर्घटनेत आम्ही ६६ जणांना गमावले.
जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आरोग्यमंत्री केमल मेमिसोग्लू यांनी दिली. बोलूचे गव्हर्नर अब्दुलअजीज अयदीन यांनी स्थानिक वृत्तसंस्था टीआरटीला सांगितले की, हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आणि वेगाने ११ मजली इमारतीत पसरली.
आगीच्या वेळी हॉटेलची फायर डिटेक्शन सिस्टीम काम करत नव्हती. तिसऱ्या मजल्यावरील पाहुणे अटकन येल्कोवन म्हणाले, "माझ्या पत्नीला जळण्याचा वास येत होता. अलार्म वाजला नाही. आम्ही वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न करत होतो पण आगीमुळे जाऊ शकलो नाही. अग्निशमन दलाच्या पथकांना घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे एक तास लागला, असेही येल्कोवन यांनी सांगितले. वरच्या मजल्यावर अडकलेले लोक ओरडत होते. काहींनी चादरीला लटकण्याचा प्रयत्न केला तर काहींनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या.
या घटनेच्या चौकशीसाठी सरकारने सहा वकिलांची नेमणूक केली आहे. आग पसरण्यात हॉटेलच्या लाकडी बाह्य रचनेचा मोठा वाटा असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
१६१ खोल्या असलेल्या या हॉटेलची जागा एका उंच टेकडीवर असल्याने आग विझविणे अवघड झाले होते. हॉटेलच्या लॉबीचा संपूर्ण भाग जळून खाक झाला, काचेच्या खिडक्या तुटल्या, लाकडी रिसेप्शन डेस्क पूर्णपणे जळून खाक झाला आणि झालर जमिनीवर पडल्याचे सांगतले जात आहे.
कार्तलकाया हे तुर्कीमधील प्रमुख हिवाळी पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे स्की हंगामात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. हे रिसॉर्ट इस्तंबूलच्या पूर्वेस सुमारे २९५ किमी (१८३ मैल) अंतरावर आहे. सरकारने अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेची सविस्तर चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
संबंधित बातम्या