देशात HMPV व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ६ वर, चेन्नईमध्ये २ मुलांना लागण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशात HMPV व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ६ वर, चेन्नईमध्ये २ मुलांना लागण

देशात HMPV व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ६ वर, चेन्नईमध्ये २ मुलांना लागण

Jan 06, 2025 10:51 PM IST

HMPV outbreak : चेन्नईत एचएमपीव्हीचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. आता संपूर्ण देशात एकूण बाधितांची संख्या ६ झाली आहे. यापूर्वी कर्नाटकात २, गुजरातमध्ये १ आणि कोलकात्यात १ रुग्ण आढळला होता.

चेन्नईमध्ये २ मुलांना HMPV लागण
चेन्नईमध्ये २ मुलांना HMPV लागण

चीनमध्ये पसरलेल्या या विषाणूने भारतातही जोर पकडायला सुरुवात केली आहे. नुकतेच चेन्नईत या विषाणूचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या दोघ रुग्णांसह भारतात आतापर्यंत एचएमपीव्हीचे एकूण ६ रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी बेंगळुरूमध्ये दोन, गुजरातमध्ये एक आणि पश्चिम बंगालमध्ये एक रुग्ण आढळला आहे. दोन मुलांना ह्युमन मेटाप्युमोव्हायरसची (HMPV) लागण झाल्याचे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. या दोघांवर सध्या चेन्नईत उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात असल्याचे समोर आले आहेत. 

तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी जनतेला आश्वासन दिले की, वैद्यकीय अधिकारी संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शेजारच्या देशातील वाढत्या रुग्णसंख्येवरही मंत्रालय लक्ष ठेवून आहे.

एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणांबाबत सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. नीलकंठ मिश्रा म्हणाले की, सध्या भारत सरकारकडून याबाबत कोणतीही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. केवळ प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आमची वैद्यकीय सेवा पूर्णपणे सज्ज आहे. पण तरीही पाळत ठेवणे आणि प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. हा विषाणू एक सामान्य संसर्गजन्य विषाणू आहे, तो कोविड इतका जीवघेणा किंवा अत्यंत संक्रामक नाही.

यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, ब्रोन्कोन्यूमोनियाने ग्रस्त असलेल्या तीन महिन्यांच्या बाळाला बेंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे चौकशी केली असता त्याला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्याला यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात तीन जानेवारी रोजी आठ महिन्यांच्या मुलाला दाखल करण्यात आले होते, जिथे तो पॉझिटिव्ह आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, ते आता संसर्गातून बरे झाले आहेत.

या दोन्ही प्रकरणांमध्ये यापैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे. ही प्रकरणे आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एचएमपीव्हीचा संसर्ग भारतासह अनेक देशांमध्ये आधीच पसरत आहे आणि विविध देशांमध्ये त्याच्याशी संबंधित श्वसनाच्या आजारांची प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही पूर्णपणे सतर्क आहे. एचएमपीव्हीसंदर्भात आरोग्य विभागाकडून लोकांसाठी एक ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर