मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  hinduja family news : नोकरांपेक्षा पाळीव कुत्र्यांवर जास्त खर्च करते हिंदुजा कुटुंब; प्रकरण न्यायालयात

hinduja family news : नोकरांपेक्षा पाळीव कुत्र्यांवर जास्त खर्च करते हिंदुजा कुटुंब; प्रकरण न्यायालयात

Jun 18, 2024 04:16 PM IST

Hinduja Family in swiss court : हिंदुजा कुटुंबीय त्यांच्या घरातील नोकरांचं शोषण करत असल्याचा आरोप एका सरकारी वकिलानं न्यायालयात केला आहे.

नोकरांपेक्षा पाळीव कुत्र्यांवर जास्त खर्च करतात हिंदुजा कुटुंबीय; प्रकरण कोर्टात
नोकरांपेक्षा पाळीव कुत्र्यांवर जास्त खर्च करतात हिंदुजा कुटुंबीय; प्रकरण कोर्टात

Hinduja Family in swiss court : ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब अशी ओळख असलेलं हिंदुजा कुटुंब सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडलं आहे. एका सरकारी वकिलानं हिंदुजा कुटुंबीयांच्या विरोधात मानवी तस्करीचा व शोषणाचा खटला दाखल केला आहे. हे कुटुंब आपल्या नोकरांपेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च करते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींना तुरुंगाची हवा खायला लावावी, अशी मागणी याचिकाकर्त्या वकिलानं केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्वित्झर्लंडच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी आहे. सरकारी वकिलाच्या म्हणण्यानुसार, एका महिलेला आठवड्यातील सात दिवस दररोज १८ तास काम करायला लावलं जातं. त्यासाठी केवळ सात स्विस फ्रँक (६.१९ पौंड) दिले जातात.

नोकरदार वर्ग कायम उपलब्ध राहावा म्हणून कर्मचाऱ्यांच्या करारांमध्ये कामाचे तास किंवा सुट्टीचे दिवस नमूद करण्यात आलेले नाहीत. हिंदुजा कुटुंबानं घरातील नोकरांचे पासपोर्टही जप्त केले आहेत. त्यांचं वेतन भारतात दिलं जात असल्यानं त्यांच्याकडं खर्च करण्यासाठी स्विस फ्रँकही नाहीत, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी केला आहे.

नोकरांना मालकाच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडता येत नाही आणि त्यांना फारसं स्वातंत्र्य नसतं. अजय हिंदुजा आणि त्याची पत्नी नम्रता यांना तुरुंगवासाची शिक्षा द्यावी. या कुटुंबाला न्यायालयीन खर्चापोटी १ दशलक्ष स्विस फ्रँक भरपाई देण्याची आणि कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ३.५ दशलक्ष फ्रँक देण्याची शिक्षा करावी, अशी मागणी तक्रारदार वकिलानं न्यायालयाकडं केली आहे.

हिंदुजा समूहानं फेटाळले आरोप

हिंदुजा कुटुंबाच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी नोकरांच्या साक्षीचा हवाला देत सांगितले की हिंदुजा कुटुंबातील सर्व नोकरांना सन्मानानं वागवलं जातं. कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था मालकांकडून केली जात असल्यानं केवळ रोख रक्कम म्हणजे वेतन असं गृहित धरता येणार नाही. सरकारी वकील या प्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही हिंदुजा कुटुंबीयांनी केला.

मुलांसोबत पिक्चर बघणं हे काम आहे का?

'कर्मचाऱ्यांना अठरा तास काम करायला लावलं जातं हा आरोप म्हणजे अतिशयोक्तीचा उत्तम नमुना आहे. घरातील कर्मचारी मुलांसोबत चित्रपट पाहण्यासाठी बसतात, तेव्हा ते काम मानता येईल का? तसं म्हणता येणार नाही,' असा मुद्दाही हिंदुजा कुटुंबाच्या वकिलांनी मांडला. या प्रकरणी न्यायालय नेमका काय निर्णय देतं याविषयी उत्सुकता आहे.

WhatsApp channel
विभाग