Himanta Biswa sarma on muslim population : आसाममध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. ही संख्या आता ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही एक मोठी समस्या आहे. माझ्यासाठी हा राजकीय प्रश्न नसून जीवन-मरणाचा प्रश्न आहे, असं वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे.
ते बुधवारी रांचीमध्ये बोलत होते. 'आसाममध्ये १९५१ साली अवघे १२ टक्के मुस्लिम होते. आज ते ४० टक्क्यांवर गेले आहेत. वेगानं होणारा हा डेमोग्राफीतील बदल माझ्यापुढचं मोठं आव्हान आहे. आजघडीला आपण अनेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाही. माझ्यासाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.
हिमंता बिस्वा सरमा हे बेधडक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. काँग्रेस, गांधी कुटुंब व धार्मिक मुद्द्यावर ते सातत्यानं बोलत असतात. याआधी १ जुलै रोजी त्यांनी असंच एक वक्तव्य केलं होतं. समाजातील एक वर्ग गुन्हेगारी कारवायांत गुंतला आहे. हे लोक एका विशिष्ट धर्माचे असून ही चिंतेची बाब आहे. एकाच धर्माचे लोक हे करत आहेत, असं मला म्हणायचं नाही. पण लोकसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती चिंताजनक आहे,' असं ते म्हणाले होते.
बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याक समाजातील लोकांनी काँग्रेसला मतदान केले आहे. केंद्र व राज्य सरकारने केलेले विकास कार्यक्रमही या लोकांनी पाहिले नाहीत. आसाममध्ये फक्त बांगलादेशातून आलेले लोक गुन्ह्यांमध्ये सामील आहेत, असंही सरमा यांनी म्हटलं होतं.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि आसाम गण परिषदेनं एकूण ११ जागा जिंकल्या. उर्वरित तीन जागा काँग्रेसनं जिंकल्या. ईशान्य भारतातील लोकसभेच्या २४ जागांपैकी भाजपनं १५ जागा जिंकल्या आहेत. अशा प्रकारे २०१९ च्या तुलनेत या भागात भाजपचं नुकसान झालं आहे. काँग्रेसला इथं ७ जागा मिळाल्या आहेत. याआधीच्या निवडणुकीत काँग्रेसनं फक्त ४ जागा जिंकल्या होत्या, याची आठवणीह सरमा यांनी दिली. 'एका धर्माचे लोक आमच्या सरकारच्या विरोधात आहेत. या राज्यांमध्ये या धर्माच्या लोकांची लोकसंख्याही झपाट्यानं वाढत आहे. यामुळं फरक पडला आहे. हा राजकीय पराभव नाही कारण एका धर्माशी कोणी लढू शकत नाही, असं सरमा म्हणाले.
संबंधित बातम्या