विधानसभा अध्यक्षांची मोठी कारवाई.. माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या १५ आमदारांना केलं निलंबित
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विधानसभा अध्यक्षांची मोठी कारवाई.. माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या १५ आमदारांना केलं निलंबित

विधानसभा अध्यक्षांची मोठी कारवाई.. माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या १५ आमदारांना केलं निलंबित

Feb 28, 2024 02:49 PM IST

Himachal Pradesh Politics : हिमाचलमध्ये राजकीय पेच निर्माण झाला असून काँग्रेस सरकार संकटात सापडले आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले आहे.

Himachal Pradesh assembly 
Himachal Pradesh assembly 

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या १५ आमदारांना निलंबित करत सभागृहाची कार्यवाही स्थगित केली. हिमाचल प्रदेशात सध्या प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू आहे. काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग जमा होऊ लागले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने हा संपूर्ण घटनाक्रम सुरू झाला आहे. 

हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या १५ आमदारांना निलंबित करताना म्हटले की, त्यांचे कृत्य असंसदीय आहे. यामुळे सभागृह व विधानसभेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. या परिस्थितीत कामकाज सुरू ठेवणे शक्य नाही. मी प्रस्‍ताव ठेवतो की, विरोधी पक्षांच्या आमदारांना विधानसभा सभागृहातून निलंबित केले जावे. 

निलंबित केलेले आमदार पुढीलप्रमाणे - जयराम ठाकुर, विपिन सिंह परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलवीर वर्मा, त्रिलोक जमवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूर्ण चंद, इंद्र सिंह गांधी, दलीप ठाकुर आणि रणवीर सिंह.

दरम्यान काँग्रेसने नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सक्रीय केले आहे. मात्र काँग्रेससमोरच संकट वाढताना दिसत आहे. वीरभद्र सिंह यांचा मुलगा आणि हिमाचल सरकारमधील सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला आहे. विक्रमादित्य सिंह यांनी म्हटले की, आम्ही कायम पक्षाची साथ दिली आहे. सध्या मी इतकेच सांगू शकतो की, वर्तमान परिस्थितीत सरकारमध्ये राहणे योग्य नाही. यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. 

काँग्रेस आमदारांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. राज्यसभेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस एकमेव जागेवर भाजपकडून पराभूत झाली. अशा परिस्थितीत सरकार वाचवण्यासाठी आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसला चांगलीच पळापळ करावी लागत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर