देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक अपघात हे भरधाव वेगामुळे होत असतात. असे अपघात पाहून मनाचा थरकाप उडतो. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघाताची घटना चर्चेत असतानाच आता गुरुग्राममधूनही अशाच प्रकारच्या अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये एक वेगवान गाडी स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक देते. ही धडक इतकी भीषण असते की, व्यक्ती स्कूटीसह दूरपर्यंत फरफटत गेला. ही घटना तेथे असलेल्या एका बाइक शॉरूममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्कूटीस्वार व्यक्ती भाजीविक्रीचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी ते स्कूटीवरून बाजारात जात होते. त्याचवेळी एका पांढऱ्या रंगाच्या ईको स्पोर्ट्स कारने स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. गाडीच्या धडकेत व्यक्ती जवळपास ५० मीटर पुढे फरफटत गेला. ही घटना सोमवारी (२७ मे) सकाळी ४ वाजता घडली. सीसीटीव्हीमध्ये दिसते की, मोकळ्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने येते व स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक देते. धडक मारल्यानंतर गाडीचा ना वेग कमी होता ना गाडी थांबते. तर आहे त्याच वेगात पुढे निघून जाते.
घटनेनंतर परिसरातील लोकांनी स्कूटीस्वार व्यक्तीला सेक्टर१० मधीलसिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले व पंचनामा केला. पोलीस गाडीचालकाचा शोध घेत आहे.
पुण्यात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक देऊन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला हतो. या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले. यानंतर आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. आरोपीच्या वडीलांना आणि आजोबा यांना देखील अटक करण्यात आली. हा अपघात घडला त्यादिवशी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत या बाबत माहिती दिली आहे.
आरोपीच्या रक्ताचे नमुने घेत ते ससुनमध्ये पाठवण्यात आले. मात्र,आरोपीचे रक्ताचे नमुने हे कचऱ्यात फेकून देण्यात आले. रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले. तर त्याच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या रिपोर्टवर डॉक्टरांनी या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन आरोपीचे नाव टाकण्यात आले.