आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एसआर गुडलावल्लेरु अभियांत्रिकी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात 'छुपा कॅमेरा' लावलेला आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थीनींद्वारे जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान, छुप्या कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. वसतिगृहाच्या आवारात पोलिसांना कोणतेही छुपे कॅमेरे सापडले नसून तपास सुरू असल्याची माहिती गुदलावल्लेरूचे पोलीस उपनिरीक्षक सत्यनारायण यांनी पत्रकारांना दिली.
या प्रकरणातील आरोपी विजय नावाच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थ्याच्या लॅपटॉपमधून पोलिसांनी जवळपास ३०० अश्लील व्हिडिओ जप्त केले आहे. आरोपी विजय हा याच कॉलेजमध्ये बीटेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. विजयने इतर विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ विकले असावेत असा पोलिसांना संशय आहे.
महाविद्यालयात जवळपास आठवडाभरापूर्वी हा प्रकार समोर आल्याचं बोललं जातं. मात्र या प्रश्नावर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
स्वच्छतागृहात छुप्या कॅमेऱ्याने शुट केलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. याविरोधात विद्यार्थीनींनी कालपासून आंदोलन सुरू केले आहे. मोबाईल टॉर्चचे दिवे घेऊन महाविद्यालयाच्या प्रांगणात हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणात ‘आम्हाला न्याय हवा’ आणि ‘दोषींवर कारवाई करा, आम्हाला महाविद्यालयाच्या आवारात सुरक्षा द्या’ अशा घोषणा या विद्यार्थ्यांनी दिल्या.
दरम्यान, काल गुरुवारी काही विद्यार्थीनींनी वसतिगृहात असलेल्या स्वच्छतागृहात लपवलेला कॅमेरा पाहिला. याची सूचना त्यांनी तत्काळ प्रशासनाला दिली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. काल सायंकाळी सातच्या सुमारास सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात एकत्रित येऊन आंदोलन सुरू केलं. आज, शुक्रवारी सकाळपर्यंत महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते.