Hezbollah vs Israel: लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकीटॉकी हल्ल्यात हजारो लोक जखमी झाल्यानंतर हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह यांनी इस्त्रायलला कडक शब्दात इशारा दिला आहे. हिज्बुल्लाह प्रमुखाने म्हटले की, इस्त्रायलने लेबनॉनमध्ये नरसंहार केला असून हा प्रकार युद्धाच्या घोषणेसारखाच आहे. इस्रायलने ज्या प्रकारे हल्ले केले, त्यात सामान्य नागरिकांना लक्ष्य केले गेले. हा हल्ला करून इस्रायलने मर्यादा ओलांडली आहे. गेल्या दोन दिवसांत ज्याप्रकारे हल्ले झाले, त्याचे उत्तर निश्चित दिले जाईल.
लेबनॉनमध्ये दोन दिवसांत पेजर आणि वॉकीटॉकीमध्ये झालेल्या अनेक स्फोटांनंतर हिजबुल्लाहने प्रत्युत्तर दिले आहे. हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह याने या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे. शत्रूला जिथून अपेक्षित आहे आणि जिथून नाही तिथूनही कठोर आणि सडेतोड उत्तर दिले जाईल. दरम्यान, इस्रायलने गुरुवारी पुन्हा लढाऊ विमानांच्या माध्यमातून बैरूतवर हल्ला केला.
लेबनॉन आणि सीरियामध्ये संघटनेच्या दळणवळण साधनांवर मोठ्या प्रमाणावर होणारे हल्ले हा गंभीर धक्का असून इस्रायलने रेड लाईन ओलांडली आहे, असे हिजबुल्लाहच्या प्रमुखांनी गुरुवारी सांगितले आमचा समूह अधिक बळकट होईल आणि उत्तर इस्रायलमध्ये दररोज हल्ले सुरूच ठेवेल, असा दावा नसरल्लाह यांनी केला आहे. ‘हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्याने सीमेवर नवे हल्ले केले,’असे हसन नसरल्लाह यांनी एका अज्ञात ठिकाणाहून दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितले. इस्रायली लढाऊ विमानांनी बैरूतवरून खूपच खालून उड्डाण केले. त्यांच्या आवाजाने पक्षी इकडे तिकडे उडू लागले आणि खिडक्या तुटू नयेत म्हणून घरे आणि कार्यालयांमधील लोकांना खिडक्या-दारे त्वरीत उघडावे लागले.
मंगळवारी लेबनॉनमध्ये अचानक पाच हजारांहून अधिक पेझर्सचा स्फोट झाला, तर बुधवारी लढाऊ विमानांच्या वॉकीटॉकीचा स्फोट झाला. याशिवाय घरांमध्ये लावलेल्या सोलर सिस्टीमचाही स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात ३७ जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे तीन हजार जण जखमी झाले होते. इस्रायलने अद्याप या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली नसली तरी हे हल्ले त्यांनीच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इस्रायलच्या नेत्यांनी हिजबुल्लाहविरोधात लष्करी कारवाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे. नसरल्लाह म्हणाले की, हे बॉम्बस्फोट कसे करण्यात आले याचा तपास केला जात आहे. याचा आम्हाला खूप मोठा आणि गंभीर धक्का बसला आहे. शत्रूने सर्व सीमा ओलांडली आहे. तसेच गाझामधील युद्ध जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत हिजबुल्लाह इस्रायलच्या सीमेवर आपले हल्ले सुरूच ठेवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गाझावरील आक्रमण जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत लेबनॉनची आघाडी थांबणार नाही.