सोमवारी पहाटे हिजबुल्लाहने इस्रायलवर ड्रोन हल्ले केले. उत्तर इस्रायलवर हे हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिक जखमी झाले असून काही परिसरात आगही लागली असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह कमांडर आणि इराणमध्ये हमासच्या एका नेत्याला मारल्यानंतर संपूर्ण प्रदेशात तणाव वाढला आहे. यामुळे युद्ध पेटण्याची भीती वाढली आहे.
इराण-समर्थित हिजबुल्लाहने एका निवेदनात म्हटले आहे की दक्षिण लेबनॉनमधील अनेक गावांवर इस्रायली हल्ले आणि हत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी उत्तर इस्रायलमधील लष्करी तळाला लक्ष्य केले आहे. याआधी हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह याने इस्रायलचा बदला घेतला जाईल, अशी शपथ घेतली होती.
इस्त्रायली सैन्याने सांगितले की, अप्पर गॅलीलमधील आयलेट हाशहरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली असून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गाझामधील युद्धादरम्यान इस्रायल आणि हिजबुल्लाह गेल्या १० महिन्यांपासून दररोज एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करत आहेत. मात्र, या हल्याची तीव्रता कमी होती. इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा नेता इस्माइल हनीयेह आणि बेरूतमध्ये गेल्या आठवड्यात हिजबुल्लाचा कमांडर शुकर यांची हत्या झाल्यामुळे या भागातील तणाव आणखी वाढला आहे.
लेबनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे की येथील एका गावात स्मशानभूमीजवळ इस्रायली ड्रोन हल्ल्यात पॅरामेडिकसह दोन लोक ठार झाले आहेत. मिसा अल-जबाल गावात सोमवारी सकाळी झालेल्या हल्ल्याची माहिती एजन्सीने दिली. मृतांपैकी एक इस्लामिक रिसाला स्काऊट असोसिएशन पॅरामेडिक गटाचा सदस्य होता. या गटाने मारल्या गेलेल्या व्यक्तीची ओळख मोहम्मद फवजी हमादी असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले की, इस्रायल आधीच इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांशी युद्ध करत आहे. तर अमेरिकेने देखील इस्रायलवर संभाव्य हल्ल्याच्या दृष्टीने लष्कराला तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नेतन्याहू म्हणाले की, इस्रायल कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे. इराण आणि त्याच्या सहयोगी मिलिशिया गटाला चोख उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत.