israel hezbollah war : इस्रायल आणि लेबनॉनचा दहशतवादी संघटना हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता भीषण रूप प्राप्त झाले आहे. या युद्धाची व्याप्ती वाढली आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये सुरू केलेल्या लष्करी कारवाई विरोधात हिजबुल्लाहने आरपारची लढाई घोषित केली आहे. इस्रायल एकीकडे लेबनॉनमध्ये जमीनी हल्ला करून हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना ठार करत आहे. तर दुसरीकडे हिजबुल्लाहनेही इस्रायलवर रॉकेटहल्ले तीव्र केले आहेत.
हिजबुल्लाहने सलग दुसऱ्या दिवशी इस्रायलवर रॉकेटचा वर्षाव केला. इस्रायली सैन्याने सांगितले की, हिजबुल्लाहने तेल अवीवसह मध्य इस्रायलच्या सुमारे १८२ शहरांवर रॉकेट हल्ला केला. या हवाई हल्ल्यामुळे सायरन वाजले. तसेच सुरक्षिततेच्या भीतीने लोकांनी बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. रविवारी संध्याकाळी हिजबुल्लाहने बिन्यामिना-गिवात अदा जवळील इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या तळावर ड्रोनने हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलचे चार सैनिक ठार झाले असून ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या ड्रोन हल्ल्यानंतर हिजबुल्लाला चोख उत्तर देण्याचा इशारा इस्रायली लष्कराने दिला होता. इस्रायलच्या लष्करी सूत्रांनी सांगितले की, आता आयडीएफने हिजबुल्लाहच्या ड्रोन युनिटला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्रायलच्या लष्कराने सोमवारी सांगितले की, लेबनॉनकडून सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागण्यात आले. या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे तेल अवीवसह संपूर्ण मध्य इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेने अनेक रॉकेट हवेतच नष्ट केले. तर काही रॉकेट हे जमिनीवर पडले. या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले. लेबनॉनमधून येणारी अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आलेल्याचे आयडीएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच तीन क्षेपणास्त्रे ही जमिनीवर पडली असून हिजबुल्लाहच्या या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.
लेबनॉनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून हिजबुल्लाहने रविवारी रात्री उशिरा इस्रायलवर सर्वात भीषण ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी हिजबुल्लाहने पुन्हा एकदा मध्य इस्रायलचा भाग पूर्ण ताकदीनिशी हादरवून सोडला आहे. इस्रायलने २३ सप्टेंबररोजी लेबनॉनवर हल्ले सुरू केले आणि आठवडाभरानंतर सीमेपार लष्करी कारवाई सुद्धा सुरू केली आहे. तेव्हापासून इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरू आहे. हिजबुल्लाह देखील इस्रायलला कडवी झुंज देत आहे.
संबंधित बातम्या