इस्रायल आणि लेबनॉनचा दहशतवादी समूह हिजबुल्लाह यांच्यातील युद्धाला धोकादायक वळण लागले आहे. इस्रायल एकीकडे लेबनॉनमध्ये जमिनी हल्ला करून हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना टिपत असताना दुसरीकडे हिजबुल्लाहनेही इस्रायलमध्ये दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. हिजबुल्लाहने सलग दुसऱ्या दिवशी इस्रायलवर रॉकेट हल्ला करून आगीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. सोमवारी इस्रायली सैन्याने सांगितले की, हिजबुल्लाहने तेल अवीवसह मध्य इस्रायलमधील सुमारे १८२ शहरांवर रॉकेट हल्ला केला. हवाई हल्ल्यामुळे अनेक शहरात सायरन वाजले आणि सुरक्षिततेच्या भीतीने लोकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला.
रविवारी संध्याकाळी हिजबुल्लाहने बिन्यामिना-गिवात अदा जवळील इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या तळावर ड्रोनने हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलचे चार सैनिक ठार झाले असून ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
ड्रोन हल्ल्यानंतर हिजबुल्लाहला या हल्ल्याची किंमत मोजावी लागेल, असे वक्तव्य इस्रायली लष्कराकडून करण्यात आले. इस्रायलच्या लष्करी सूत्रांनी सांगितले की, आता आयडीएफने हिजबुल्लाहच्या ड्रोन युनिटला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्रायलच्या लष्कराने सोमवारी सांगितले की, लेबनॉनकडून सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे तेल अवीवसह संपूर्ण मध्य इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन सक्रिय करण्यात आले आहेत. लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमुळे मध्य इस्रायलच्या अनेक भागात सायरन वाजले. त्यानंतर लष्कराने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लेबनॉनमधून येणारी अनेक क्षेपणास्त्रे अडवण्याचे अनेक प्रयत्न झाले. आयडीएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही तीन क्षेपणास्त्रे रोखण्यात यशस्वी झालो. हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.
लेबनॉनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून हिजबुल्लाहने रविवारी रात्री उशिरा इस्रायलवर सर्वात भीषण ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी हिजबुल्लाहने पुन्हा एकदा मध्य इस्रायलचा भाग पूर्ण ताकदीनिशी हादरवून सोडला आहे. इस्रायलने २३ सप्टेंबर रोजी लेबनॉनवर हल्ले वाढवले आणि आठवडाभरानंतर सीमेपलीकडे जमिनी सैन्य पाठवले, तेव्हापासून इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरू आहे.
संबंधित बातम्या