hezbollah counterattack on israel : हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेने इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने बैरुतवर मोठे हवाई हल्ले केले होते. याच बदला म्हणून रविवारी रात्री सुमारे २५० रॉकेट व इतर शस्त्रांनी इस्रायलवर हवाली हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इस्रायलचे ७ नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. इस्रायलच्या मध्यभागी असलेल्या तेल अवीव पर्यंत हे रॉकेट पोहोचले होते. हिजबुल्लाहचा हा गेल्या काही महिन्यांतील इस्रायलवरील सर्वात घातक हल्ला मानला जात आहे.
हिजबुल्लाहने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या सात जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या मागेन डेव्हिड अडोम बचाव पथकाने दिली आहे. इकीकडे इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू आहे. तर त्याच वेळी हिजबुल्लाहने बैरूतमध्ये इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले सुरू केले आहेत.
दरम्यान, रविवारी इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनचा एक सैनिक ठार झाला आहे. तर १८ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या लष्कराने दिली आहे. इस्रायली लष्कराने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. हिजबुल्लाहविरुद्धच्या युद्धक्षेत्रात हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्टीकरण इस्रायलने दिले आहे. लष्कराची कारवाई केवळ अतिरेक्यांविरोधात करण्यात आली आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलच्या हल्ल्यात लेबनानचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत. मात्र, लेबनानचे सैन्य या युद्धापासून दूर आहे.
लेबनॉनचे काळजीवाहू पंतप्रधान नजीब मिकाती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युद्धबंदीच्या प्रयत्नांवरील हा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, रविवारी सुमारे २५० रॉकेट डागण्यात आले. त्यापैकी काही हवेटच नष्ट करण्यात आले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने शनिवारी बैरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात २९ जण ठार तर ६७ जण जखमी झाले आहेत.