इस्रायल सध्या हमास आणि हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांविरोधात दोन आघाड्यांवर थेट युद्ध लढत आहे. दरम्यान, सोमवारी लेबनानी अतिरेक्यांनी इस्रायलच्या उत्तरेकडील शहरांवर १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला इतका भीषण होता की, इस्रायलच्या शिन बेट आणि आयर्न डोम या हवाई संरक्षण यंत्रणाही अनेक क्षेपणास्त्रांना रोखण्यात अपयशी ठरल्या. हिजबुल्लाहने हायफा शहरावर ९० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. त्याचवेळी गॅलिलवर सुमारे ५० रॉकेट डागण्यात आले.
आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात एका मुलासह किमान सात जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर रस्त्यावरील अनेक वाहनांना आग लागली असून रहिवासी भागात अनेक इमारती कोसळल्या आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी एका निवेदनात लेबनॉनबरोबर शस्त्रसंधीच्या दिशेने काही प्रगती झाल्याचे सांगितल्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायली शहरांवर हल्ला केला. उत्तरेकडील बिइना शहरात रॉकेट हल्ल्यात २७ वर्षीय महिला किरकोळ जखमी झाली असून ३५ वर्षीय पुरुष आणि एक वर्षाची मुलगी जखमी झाली आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात गॅलिलवर सुमारे ५० रॉकेट डागण्यात आले, त्यापैकी काही रॉकेट्स हवाई संरक्षण यंत्रणेने रोखले, तर अनेक रॉकेट्स कार्मिएल प्रदेश आणि लगतच्या शहरांवर कोसळले. त्याचवेळी इस्रायलच्या उत्तरेकडील हायफा शहरात ९० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. लेबनॉनमधून इस्रायलच्या शहरांवर १६५ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केले. ही क्षेपणास्त्रे शहरांच्या गर्दीच्या भागातही कोसळली. यामुळे शहरवासियांमध्ये खळबळ उडाली. या भागात अनेक इमारती कोसळल्या आणि वाहनांना आग लागली.
इस्रायलडिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) सांगितले की, हिजबुल्लाह रॉकेट्सचा बॅरेज इस्रायली संरक्षण यंत्रणा "आयर्न डोम"ने रोखला, परंतु काही रॉकेट हायफा खाडीच्या लोकवस्तीच्या भागातही पडले.
दरम्यान, इराकी सशस्त्र गटांनी सोमवारी इस्रायलच्या दक्षिण आणि उत्तरेकडील आपल्या सामरिक तळांवर तीन हल्ले केल्याचा दावा केला आहे. इराकच्या इस्लामिक रेझिस्टन्स फोर्सेसने सोशल नेटवर्किंग साइट्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्लामिक सैनिकांनी सोमवारी ड्रोनचा वापर करून कब्जा केलेल्या भागाच्या दक्षिणेकडील मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. इस्रायलच्या उत्तरेकडील मोक्याच्या शहरांवर अशाच प्रकारचे आणखी दोन हल्ले करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.