Hezbollah hits israel : लेबनॉन आणि सीरियामध्ये झालेल्या पेजर आणि वॉकीटॉकीमधील स्फोटानंतर हिजबुल्लाहने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शुक्रवारी उत्तर इस्रायलच्या विविध भागांवर १४० रॉकेट डागण्यात आले. खुद्द इस्रायली लष्करानेही याला दुजोरा दिला आहे. लेबनॉनच्या सीमेवर आज दुपारी तीन बाजूंनी लक्ष्य करण्यात आले. त्याचवेळी हिजबुल्लाहने सांगितले की, आमच्या कत्युशा रॉकेट्सने सीमेपलीकडील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये हवाई संरक्षण तळ तसेच इस्रायली आर्मर्ड ब्रिगेड मुख्यालयाचा समावेश आहे.
दक्षिण लेबनॉनमधील गावे आणि घरांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हे रॉकेट डागण्यात आल्याचेही हिजबुल्लाहने स्पष्ट केले आहे. लेबनॉनस्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह याने गुरुवारी इशारा दिला होता की, या आठवड्यात संपर्क साधनांच्या माध्यमातून झालेला प्राणघातक हल्ला हा सर्व मर्यादा ओलांडणारा होता. इस्त्रायलने रेड लाईन क्रॉस केली आहे. मात्र या हल्ल्यानंतर आमचा गट अधिक बळकट होईल आणि इस्रायलवरील आपले आक्रमण सुरूच ठेवेल. नसरल्लाह यांनी अज्ञात ठिकाणाहून हा व्हिडिओ जारी केला आणि दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला होता.
लेबनॉन आणि सीरियामध्ये या आठवड्यात पेजर आणि इतर साधनांमध्ये झालेल्या स्फोटांनंतर दोन्ही देशांमध्ये ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या सीमेपलीकडून सुरू असलेल्या गोळीबाराचे रूपांतर मोठ्या युद्धात होण्याची शक्यता वाढली आहे. दळणवळणाच्या उपकरणांमध्ये झालेल्या स्फोटात ३७ जण ठार तर सुमारे तीन हजार जण जखमी झाले आहेत.
नसरल्लाह म्हणाले की, दोन दिवसांपासून हा हल्ला कसा करण्यात आला याचा तपास केला जात होता. हा हल्ला इस्रायलने केल्याचे मानले जात आहे. हिजबुल्लाहने म्हटले आहे की, सीमेजवळ उत्तर इस्रायलमधील तीन लष्करी तळांना लक्ष्य केले, त्यापैकी दोन ड्रोनद्वारे करण्यात आले. मात्र, इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, हे ड्रोन वस्तीजवळ कोसळले व नष्ट झाले.
हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह याने या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे. शत्रूला जिथून अपेक्षित आहे आणि जिथून नाही तिथूनही कठोर आणि सडेतोड उत्तर दिले जाईल. दरम्यान, इस्रायलने गुरुवारी पुन्हा लढाऊ विमानांच्या माध्यमातून बैरूतवर हल्ला केला.