हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहचा मृतदेह बंकरमधून काढला बाहेर; शरीरावर जखमेची एकही खूण नाही, मग मृत्यू कसा झाला?-hezbollah chief hassan nasrallahs body recovered from bombed bunker ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहचा मृतदेह बंकरमधून काढला बाहेर; शरीरावर जखमेची एकही खूण नाही, मग मृत्यू कसा झाला?

हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहचा मृतदेह बंकरमधून काढला बाहेर; शरीरावर जखमेची एकही खूण नाही, मग मृत्यू कसा झाला?

Sep 29, 2024 07:09 PM IST

Hezbollah chief Hassan Nasrallah : हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह याला ठार करण्यासाठी इस्रायलच्या विमानांनी लेबनॉनमध्ये काही मिनिटांत ८० हून अधिक बॉम्ब टाकले. आता नसरल्लाहचा मृतदेह आढळला आहे.

हसन नसरल्लाह
हसन नसरल्लाह

इराणपुरस्कृत दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह याचा मृतदेह बॉम्बवर्षाव झालेल्या बंकरमधून बाहेर काढला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या कारवाईत सहभागी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. बैरूतमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात संपूर्ण शहर ध्वस्त झाले आहे. हिजबुल्लाहने नसरल्लाहच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांची हत्या कशी करण्यात आली हे या निवेदनात नमूद करण्यात आलेले नाही किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराचा तपशील देण्यात आलेला नाही. सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की, नसरल्लाहच्या शरीरावर कोणतीही जखम आढळली नाही. स्फोटानंतर गुदमरून किंवा आघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

लेबनॉनची दशहतवादी संघटना हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह याला ठार मारण्यासाठी इस्रायलच्या विमानांनी लेबनॉनमध्ये काही मिनिटांत ८० हून अधिक बॉम्ब टाकले. न्यूयॉर्क टाइम्सने इस्रायलच्या दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. इस्रायलच्या लष्कराने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये नसरल्लाहच्या हत्येच्या दिवशी हे विमान लेबनॉनवर हल्ला करण्यासाठी उड्डाण करताना दिसत आहे. सुमारे दोन हजार पौंड वजनाचे पंधरा बंकर-बस्टर बॉम्ब बीएलयू-१०९ ची गणना केली. इस्रायलच्या विमानांनी बैरूतच्या दक्षिण उपनगरावर केलेल्या हल्ल्यात चार सात मजली इमारती उद्ध्वस्त केल्या. दक्षिणेकडील बैरूत उपनगरात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात संघटनेचा म्होरक्या हसन नसरल्लाह ठार झाल्याच्या वृत्ताला हिजबुल्लाहने दुजोरा दिला आहे.

हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात हल्ले -

इस्रायलच्या हवाई दलाने गेल्या आठवड्यापासून लेबनॉनच्या विविध भागात हिजबुल्लाहच्या तळांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. बैरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या उच्चपदस्थ कमांडर्सचा खात्मा करण्यात आला. इस्रायली लष्कराने आतापर्यंत हिजबुल्लाहच्या हजारो तळांवर हल्ले केल्याची माहिती दिली आहे. 

२००६ मध्ये लेबनॉनच्या दुसऱ्या युद्धानंतर इस्रायलने हिजबुल्लाहवर एवढ्या तीव्रतेने हल्ला केलेला नाही, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, इस्रायलच्या लष्कराने रविवारी हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या एका महत्त्वाच्या सदस्याला ठार केल्याची माहिती दिली. लष्कराने शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या सेंट्रल कौन्सिलचे उपप्रमुख नबील कौक यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

 

Whats_app_banner