मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मोदींच्या अबु धाबी दौऱ्यापूर्वी पावसाचा कहर; सभेत उपस्थितांच्या संख्येत कपात करण्याचे आदेश

मोदींच्या अबु धाबी दौऱ्यापूर्वी पावसाचा कहर; सभेत उपस्थितांच्या संख्येत कपात करण्याचे आदेश

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 13, 2024 11:40 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मंगळवारपासून अबु धाबी आणि कतरचा दोन दिवसीय दौरा सुरू होतोय. अबु धाबीमध्ये मोदी एका हिंदू मंदिराचे उदघाटन करणार आहे. शिवाय भारतीयांच्या एका मेळाव्याला संबोधित करणार आहेत. परंतु अबु धाबीत मुसळधार पाऊस कोसळल्याने उपस्थितांची संख्येत कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

A school bus and other vehicle partially submerged as heavy rains batter parts of the UAE. (Al Arabiya News/X)
A school bus and other vehicle partially submerged as heavy rains batter parts of the UAE. (Al Arabiya News/X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates-UAE) च्या दौऱ्यावर आहेत. १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी अबु धाबीमध्ये वर्ल्ड गव्हर्मेंट समिटमध्ये सामील होणार असून BAPS हिंदू मंदिराचे उदघाटन करणार आहे. शिवाय अबु धाबीतील झाहेद स्पोर्ट्स सीटी मैदानावर अनिवासी भारतीय नागरिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. परंतु अबु धाबीत अचानक हवामान बदलले असून प्रचंड पाऊस कोसळत आहे. परिणामी येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मोदींच्या सभेसाठी निमंत्रितांच्या संख्येत कपात करण्याचे आदेश आयोजकांना देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ८० हजार अनिवासी भारतीयांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर फक्त ३५ हजार नागरिकांना बोलावण्याचे आदेश यूएईच्या प्रशासनाने दिले आहे. यूएईच्या मनुष्यबळ मंत्रालयाने (एमओएचआरई) आयोजक कंपन्यांना त्यांच्या कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले आहे. मुसळधार पावसामुळे यूएईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून शाळांना ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहे.

मनुष्यबळ मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी केले आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर यूएईतील कंपन्यांनी कार्यालयीन काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता महत्वाचे असून ते सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

‘हॅलो मोदी’ कार्यक्रमावर पावसाचे सावट?

अबु धाबीतील झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिवासी भारतीयांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली असून खराब हवामानामुळे यात कमी लोक सहभागी होतील, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक संजीव पुरुषोत्तम यांनी वृत्तसंस्थेला दिला. 'अहलान मोदी' (हॅलो मोदी) असं या कार्यक्रमाचं नाव असून यात सहभागी होणाऱ्यांची संख्या ८० हजारवरून ३५ हजार एवढी कमी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ६० हजार लोकांनी नोंदणी केली होती.

आठ महिन्यात मोदी तिसऱ्यांदा यूएई दौऱ्यावर

आखाती देशांमध्ये सुमारे ३५ लाख भारतीय नागरिक राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०१५ पासून यूएईचा हा सातवा दौरा आहे. तर गेल्या आठ महिन्यांच्या काळात मोदी तिसऱ्यांदा यूएईला भेट देत आहेत. या दौऱ्यात यजमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झाएद अल नाहयान यांच्याशी द्विपक्षीय भेट घेणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांचीही मोदी भेट घेतील.

WhatsApp channel

संबंधित बातम्या