rajasthan Heatwave : सध्या भारतात भीषण उन्हाळा सुरू असून अनेक भागात उष्णेतेची लाट आली आहे. उष्णतेचा कहर असा आहे की, उन्हात जाताच त्वचा काळवंडत आहे. असे वाटते की पेटत्या भट्टीजवळून जात आहोत. सोशल मीडियावर प्रत्येक वर्षी लोक उन्हाचा कहर दाखवणारे व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये लोक घराच्या छतावर, गाडीच्या बोनेटवर अंड्याचे आम्लेट करताना दिसत आहेत. तर काही जण उन्हात थेट डाळ-भातच शिजवताना दिसतात.
सध्या राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आली असून पारा ४७ अंशावर पोहोचला आहे. राजस्थानच्या अधिकांश भागात पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर बीकानेरमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डरवर एक बीएसएफ जवान उष्णतेचा कहर पापडाच्या माध्यमातून दाखवत आहे. जवानाने गर्मीची दाहकता दाखवण्यासाठी पापडाची मदत घेतली.
वाळूत पुरला पापड -
बीकानेरमध्ये सद्या उकाड्याने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणे लोकांसाठी एखाद्या शिक्षेहून कमी नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षा दलाचे जवान भारत-पाकिस्तान बॉर्डरवर पहारा देत आहेत. एका बीएसएफ जवानाने गर्मीची स्थिती लोकांशी शेअर केली आहे. जवानाने वाळवंटातील वाळून एक पापड पुरला. जवान आधी एक पापड घेऊन वाळवंटात गेला आणि त्याने तेथील वाळूत तो पापड लपवला. त्यानंतर ३५ सेकंदानंतर जवानाने तो पापड जसा वाळूतून बाहेर काढला, त्यानंतर पापडाची स्थिती पाहून थक्क झाला.
तप्त वाळून पापड भाजला -
कडक उन्हात जेव्हा पापड वाळूच्या आतमध्ये ३५ सेकंदासाठी ठेवला, तेव्हा हा पापड जवळपास ७० टक्के भाजला गेला. जवानाने वाळूतून पापड बाहेर काढून लोकांना याची स्थिती दाखवली. केवळ काही भागात पापड कच्चा असल्याचे दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी कमेंट करत उन्हाचा कहर सांगितला आहे. एका व्यक्तीने सांगितले की, पूर्वजांनी वाळवंटात रोटी भाजल्या होत्या, आता तर केवळ पापड आहे. तसेच अनेकांनी बीएसएफ जवानांच्या देशसेवेचे कौतुक केले आहे.