दिल्लीजवळ फरिदाबाद येथे मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. फरिदाबाद शहरात जुन्या रेल्वे स्थानाकजवळ असलेल्या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यातून कारने प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. भुजारी मार्गात साचलेल्या पाण्यात कार बुडाल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघे जण एचडीएफसी बँकेचे कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार पुण्यश्रय मिश्रा (वय ४८ वर्ष) आणि विराज द्विवेदी (वय २६) असं या मृतांची नावे आहे. दोघेही कारने गुरुग्रामहून ग्रेटर फरिदाबाद येथील आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुण्यश्रय शर्मा हे एचडीएफसी बँक, गुरुग्राम शाखेत व्यवस्थापक होते तर विराज द्विवेदी हे एचडीएफसीच्या गुरुग्राम सेक्टर ३१ मधील शाखेत कॅशियर म्हणून कार्यरत होते.
काल, शुक्रवारी फरिदाबाद शहरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे जुने फरिदाबाद येथील रेल्वेचा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला होता. भुयारी मार्गातून वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी एक्सयूव्ही 700 या कारच्या चालकाने इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत वाहन अंडरपासमध्ये घुसवले. पुराच्या खोल पाण्यात ही कार अडकली. त्यानंतर गाडीत पाणी शिरले. या दोघांना भुयारात साचलेल्या पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. रेल्वेच्या भुयारी मार्गात एक एसयूव्ही कार अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात कार टाकल्यानंतर ती बुडू लागताच कारमधील विराज द्विवेदी याने गाडीतून बाहेर येऊन पोहून पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला. तर पुण्यश्रय शर्मा कारच्या आतमध्येच बसून होता. या दोघांना पादचाऱ्यांनी मदत करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र दोघांचाही भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. पुयाश्रय पोलिसांना पुण्यश्रय शर्मा यांचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला आणि विराज द्विवेदी यांचा मृतदेह प्रदीर्घ शोध मोहिमेनंतर शनिवारी पहाटे चार वाजता सापडला. पुण्यश्रय शर्मा याला पाण्याबाहेर काढल्यानंतर बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेबाबत दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती एनआयटी फरिदाबाद पोलिस ठाण्याचे एसएचओ इन्स्पेक्टर समीर सिंह यांनी दिली.