Hathras Stampede CCTV Footage : आपल्या भक्तांमध्ये भोले बाबा नावाने प्रसिद्ध असलेला व हाथरसमध्ये सत्संग केलेल्या स्वयंभू बाबा सूरजपाल यांच्या वकीलांनी बुधवारी दावा केला होता की, चेंगराचेंगरीची घटना घडण्यापूर्वीच भोले बाबा सत्संग स्थळावरून निघून गेले होते. मात्र ४० सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने बाबाच्या खोटेपणाचा भांडाफोड केला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये दिसते की, बाबा आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह भरधाव वेगाने जात आहे. बाबा पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसला आहे आणि त्याच्या पुढे व मागे बाइकवर स्वार ब्लॅक कमांडो त्याला एस्कॉर्ट करत आहेत.
स्वयंघोषित धर्मोपदेशक बाबा नारायण हरी ऊर्फ साकार विश्व हरी भोले बाबा यांचा ताफा गावातून निघत असल्याचे क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) फुटेज समोर आले आहे.
पीटीआयने शेअर केलेल्या फुटेजमध्ये भोळे बाबांचा ताफा ओलांडत असताना रस्त्याच्या दुतर्फा 'सेवक' म्हणून ओळखले जाणारे अनेक स्वयंसेवक उभे असल्याचे दिसत आहे.
हाथरस जिल्ह्यातील सिकंदरा राऊ भागातील रती भानपूर गावात एका विशेष तंबूत आयोजित केलेल्या सत्संगासाठी लाखो लोक जमले असताना मंगळवारी चेंगराचेंगरी झाली होती.
धार्मिक मेळावा संपल्यानंतर महिलांनी कार्यक्रमस्थळाबाहेर धाव घेतल्यानंतर लगेचच चेंगराचेंगरी सुरू झाली. प्रत्यक्षदर्शी गोपाल कुमार यांनी सांगितले की, सभा दुपारी दोनच्या सुमारास संपली. बाबा उपस्थित महिला, पुरुष आणि मुलांच्या जमावाला डावलून ठरलेल्या मार्गावरून बाहेर पडले. आजूबाजूला वाहने होती आणि महामार्गाचा काही भाग भाविक आणि वाहनांनी भरून गेला होता.
बाबांचे वाहन महामार्गावर पोहोचताच शेकडो भाविक त्यांची चरणधुळ मस्तकी लावण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या गाडीकडे धावले. प्रचंड गर्दी महामार्गाच्या दिशेने धावली आणि अनेकांना चढता आले नाही आणि ते घसरले... भाविक पडल्याने महामार्गाकडे धाव घेणाऱ्या इतरांनी त्याची पर्वा न करता बाबांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खाली पडलेले लोक चिरडले गेले. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि पडलेल्यांना उठता आले नाही... त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अधिकांश महिला आहेत.
गुरुवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले की, सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या सहा जणांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. प्रकाश मधुकर असे या मुख्य आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
संबंधित बातम्या