हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा १२१ वर पोहोचला आहे. या प्रकरणी सत्संग आयोजकांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर दाखल केला आहे. मात्र, एफआयआरमध्ये आकार विश्व हरी भोळे बाबा म्हणून ओळखले जाणारे बाबा नारायण हरी यांचे नाव आरोपी म्हणून नाही.
सिकंदरा राव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 'मुख्य सेवादार' देवप्रकाश मधुकर आणि अन्य आयोजकांची नावे आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध), ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न), १२६ (२) (चुकीच्या पद्धतीने रोखणे), २२३ (सरकारी कर्मचाऱ्याच्या आदेशाचा अवमान करणे), २३८ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत मृतांचा आकडा १२१ वर पोहोचला असून २८ जण जखमी झाल्याची माहिती मदत आयुक्त कार्यालयाने दिली.