हाथरस जिल्ह्यात मंगळवारी ज्यांच्या सत्संगात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, ते नारायण साकार हरी ऊर्फ भोले बाबा हे उत्तर प्रदेशचे माजी पोलिस कर्मचारी सूरज पाल आहेत. ज्यांनी स्थानिक गुप्तचर विभागात (Local Intelligence Unit) १८ वर्षे काम केले आणि १९९० मध्ये एटा येथे तैनात असताना अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
एटा-कासगंज आणि ब्रज प्रदेश आणि इतर काही भागांतील निम्न मध्यमवर्गीय आणि गरिबांमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. स्वच्छ शेव्हिंग आणि पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेसाठी ओळखले जाणारे ते आपल्या सत्संगात सिंहासनासारख्या उंच खुर्चीवर बसतात, तर कधी पत्नीही सोबत असतात.
नोकरी सोडून अध्यात्मिक मार्ग स्वीकारल्यानंतर ते कासगंज जिल्ह्यातील आपल्या गावात झोपडीत राहू लागले. आग्रा आणि अलिगढ विभागातील ब्रज भागातील गावांमध्ये फिरून त्यांनी प्रचारक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि सत्संग आयोजित करण्यास सुरवात केली.
त्यांची प्रवचने लोकप्रिय होऊ लागल्यावर एटा-कासगंज आणि जवळच्या ब्रज प्रदेशात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या इतर भागात त्यांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने वाढले.
कोविड महामारीच्या काळात अलीगड-एटा मध्ये भोळे बाबा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते जेव्हा त्यांनी काही वेळा समारंभांवर निर्बंध असताना सत्संग आयोजित केले होते.
भोळे बाबांची माणसं बहुतेक फिकट गुलाबी शर्ट, ट्राऊझर आणि पांढऱ्या टोप्या परिधान करतात. लाठी घेऊन ते त्यांच्या कार्यक्रमांमध्ये वाहतूक आणि अंतर्गत व्यवस्था सांभाळतात. त्यांची लोकप्रियता असूनही माध्यमांना त्यांच्या सत्संगापासून दूर ठेवले जाते आणि भोळेबाबांविषयी कोणतीही वैयक्तिक माहिती प्रसिद्ध केली जात नाही, तसेच अधिक विशिष्ट तपशीलही माहित नसतो.
त्यांची सत्संग सत्रे साधारणपणे तीन ते चार तास चालतात आणि त्यात मोठ्या संख्येने स्त्रिया असतात. दर मंगळवारी त्यांचा सत्संग होतो.
अनेकदा ते किंवा त्यांची गाडी जिथून जाते, तिथे अनुयायांची गर्दी होत असते. आज मानव मंगल मिलन समागम समितीने हाथरसमधील मुगलगढी भागात असलेल्या फुलराई गावात भोले बाबाच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ५० हजारांहून अधिक लोकांची गर्दी जमली होती.
त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले आहे की, त्यांना 'गुरू' नसून दैवी ज्ञान आहे. त्यांच्या सत्संगाला काही लोकप्रतिनिधी वेळोवेळी हजेरी लावतात.
संबंधित बातम्या