हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी दोन याद्या जाहीर करत एकूण ३२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. या यादीमध्ये आपने जींद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून माजी जागतिक कुस्ती एंटरटेनमेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) कुस्तीपटू कविता दलाल यांना उमेदवारी दिली आहे. तिची लढत ऑलिम्पिक कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगटशी होणार आहे. काँग्रेसने विनेश फोगाट यांना जुलाना मधून उमेदवारी दिल्यापासून हा मतदारसंघ देशभरात चर्चेत आला आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने जुलाना विधानसभा मतदारसंघातून कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. ३५ वर्षीय योगेश बैरागी हे एका आघाडीच्या एअरलाइन्समध्ये वरिष्ठ वैमानिक होते.
'आप'च्या उमेदवार कविता दलाल यांना लेडी खली म्हणूनही ओळखले जाते. २०२२ मध्ये त्यांनी आम आदमी पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या जुलाना विधानसभा मतदारसंघातील माळवी गावच्या रहिवासी आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर विनेश फोगट आणि इतर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कविताने पाठिंबा दिला होता, पण तीच कविता आता निवडणुकीच्या रिंगणात विनेशसोबत दोन हात करणार आहे.
'फर्स्ट लेडी' पुरस्कार मिळवणारी कविता डब्ल्यूडब्ल्यूईमधील भारतातील पहिली महिला कुस्तीपटू आहे. तिने २०१७ ते २०२१ दरम्यान डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भाग घेतला आहे. कविता दलालने १२ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर ती द ग्रेट खलीच्या कॉन्टिनेंटल रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये सामील झाली आणि व्यावसायिक कुस्तीत उतरली. येथे ती सलवार कुर्ती परिधान करून रिंगमध्ये उतरली होती. यामुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. कविता ही उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बिजवारा गावची सून आहे. हरयाणात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
विनेशने बुधवारी (११ सप्टेंबर) रोजी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिने निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची संपूर्ण माहिती दिली आहे.विनेशने सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, तिचे २०२३-२४ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न १३ लाख ८५ हजार १५२ रुपये आहे. तर तिचा पती सोमवीर राठीचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ४४ हजार २२० रुपये आहे. विनेशकडे ३ आलिशान कार आहेत, तर तिच्या पतीकडे एक आलिशान कार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार या वाहनांची किंमत १ कोटी २३ लाख रुपये एवढी आहे. त्याचबरोबर करोडो रुपये किमतीचे घर, बँकेत एफडी, शेअर बाजारात गुंतवणूक आहे.