हरियाणामधील गुरुग्राममधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रेस्टॉरंटमध्ये माउथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच लोकांची तब्येत बिघडली. त्यांना तत्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित लोकांच्या तक्रारीनुसार हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
अंकित कुमार नावाचा व्यक्ती आपली पत्नी व मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी खेडकीदौला सेक्टर ९० मधील लाफारेस्टा रेस्टॉरंटमध्ये गेला होता. जेवण केल्यानंतर रेस्टॉरंट स्टाफने त्यांना माउथ फ्रेशनर ऑफर केले. माउथ फ्रेशनर तोंडात टाकताच त्यांची तब्येत बिघडल्याचा आरोप आहे.
पाहता-पाहता त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. रेस्टॉरंट मालक व स्टाफजवळच उभे राहून हे पाहत होते. त्यानंतर अंकितने गुरुग्राम पोलिसात याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पीडितांना रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार माउथ फ्रेशनर खाताच त्यांच्या जिभेतून रक्त येऊन लागले, उलट्या होऊ लागल्या. रेस्टॉरंटमध्येच त्यांची तब्येत बिघडली. सर्व पाच जण तब्येत बिघडल्याने व वेदनेने ओरडत होते मात्र रेस्टॉरंट मालक व स्टाफने बघ्याची भूमिका घेतली.
पीडितांमध्ये महिलांचाही समावेश आहे.घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पीडित म्हणत आहेत की, पाहा या लोकांनी काय चारले आहे. सर्वजण उलट्या करताना दिसत आहे. सर्वांच्या तोंडातून रक्त येताना दिसत आहे.
संबंधित बातम्या