धक्कादायक! विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या खुर्चीखाली ठेवला बॉम्ब, युट्यूबवरून माहिती घेऊन रिमोटच्या मदतीनं केला स्फोट
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक! विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या खुर्चीखाली ठेवला बॉम्ब, युट्यूबवरून माहिती घेऊन रिमोटच्या मदतीनं केला स्फोट

धक्कादायक! विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या खुर्चीखाली ठेवला बॉम्ब, युट्यूबवरून माहिती घेऊन रिमोटच्या मदतीनं केला स्फोट

Nov 17, 2024 10:14 AM IST

haryana news : हरियाणा येथे एका शाळेत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शाळा प्रशासन आणि शिक्षण विभाग हादरला आहे. शाळेतील काही मुलांनी एका शिक्षिकेच्या खुर्ची खाली बॉम्ब ठेवत त्याचा रिमोटच्या साह्याने स्फोट केला.

विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या खुर्चीखाली ठेवला बॉम्ब, युट्युबवरून शिकत रिमोटच्या साह्याने केला स्फोट
विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या खुर्चीखाली ठेवला बॉम्ब, युट्युबवरून शिकत रिमोटच्या साह्याने केला स्फोट

haryana news : हरयाणातील हिसार जिल्ह्यात एका शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी युट्युबवर बॉम्ब कसा तयार करायचा याची माहिती घेऊन बॉम्ब तयार केला. हा बॉम्ब त्यांनी शाळेच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिकेच्या खुर्चीखाली ठेवून त्याचा रिमोटच्या साह्याने स्फोट केला. या घटनेत सुदैवाने शिक्षका बचावली आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल शाळेने घेतली असून या मुलांना शाळेतून आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

शिक्षिकेने शिवीगाळ केल्याने बदला घेण्यासाठी केले कृत्य

महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याने काही विद्यार्थ्यांनी या शिक्षिकेला बदला घेत धडा शिकवण्याचं ठरवलं. एका विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्बसदृश्य फटाका ठेवला तर दुसऱ्या विद्यार्थ्याने रिमोट कंट्रोलद्वारे त्याचा स्फोट केला. विद्यार्थ्यांनी युट्युबवरून बॉम्ब कसा तयार करायचं हे यूट्यूबच्या माध्यमातून शिकून रिमोट कंट्रोलने त्याचा स्फोट केला.

युट्युबवरून व्हिडिओ पाहून तयार केला बॉम्ब

मुलांनी शिक्षिकेचा बदला घेण्यासाठी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बॉम्ब तयार केला. एवढेच नाही तर त्याचा रिमोटच्या साह्याने कसा स्फोट करावा याचे मॉडेल देखील त्यांनी व्हिडिओ पाहून तयार केले. हा बॉम्ब त्यांनी वर्गात शिक्षिकेच्या खुर्ची खाली ठेवला. वर्गशिक्षिका वर्गात आल्यावर खुर्चीत बसल्या अनाई यानंतर रिमोटच्या मदतीने बॉम्बचा स्फोट करण्यात आला.

शिक्षण विभागाने केली कठोर कारवाई

या घटनेची गंभीर दखल हिसार जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने घेतली आहे. या प्रकरणी सर्व १३ विद्यार्थ्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत पोहोचून घटनेची चौकशी सुरू केली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात यावे, अशी चर्चाही या घटनेनंतर झाली होती, मात्र त्यांच्या पालकांनी माफी मागितली आणि भविष्यात मुले असे काम करणार नसल्याचे लेखी निवेदन दिले. त्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली.

या घटनेनंतर संबंधित गावात पंचायतीची बैठकही बोलावण्यात आली होती. मुलांच्या या कृत्याची चौकशी देखील पंचायतीत करण्यात आली. पंचायतीदरम्यान वर्गातील १५ पैकी १३ विद्यार्थ्यांचा यात सहभाग असल्याचं उघडकीस आलं. यावर पुढे काय कारवाई करावी का, याचा विचार केला जात आहे.

जिल्हा शिक्षणाधिकारी नरेश मेहता म्हणाले की, शिक्षकाने विद्यार्थ्यांना माफ केले आहे. या मुलांनी मॉडेल बनवून ते सादर केले असते तर आम्ही त्यांचा सन्मान केला असता, पण आता इशारा देऊन हे प्रकरण मिटले आहे. ही मुले युट्युबवरून हे सर्व शिकली.

या घटनेमुळे शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑनलाइन कंटेंटचा मुलांवर कोणत्या प्रकारचा परिणाम होऊ शकतो आणि त्यावर किती प्रमाणात नियंत्रण ठेवले पाहिजे, यावर आता चर्चा होऊ लागली आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर