निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख बदलली आहे. आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. यापूर्वी १ ऑक्टोबरला मतदान होणार होते. मात्र जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तारखेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जम्मू व काश्मीर विधानसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन्ही राज्यांतील निवडणुकांचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रीय राजकीय पक्ष, राज्य राजकीय पक्ष आणि अखिल भारतीय बिश्नोई महासभेकडून मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती. हरियाणातील बिश्नोई समुदायातील लोक शतकानुशतके जुन्या असोज अमावस्या उत्सवात सहभागी होण्यासाठी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्याची निवेदने आयोगाला प्राप्त झाली आहेत.
यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता होती. असे निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
भारत निवडणूक आयोगाने शनिवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक बदलण्याची घोषणा केली. राज्यात १ ऑक्टोबर ऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्ष तसेच अखिल भारतीय बिश्नोई महासभेच्या निवेदनांचा हवाला देत म्हटले आहे की, हरियाणातील बिश्नोई समुदायाचे लोक शतकानुशतके जुन्या असोज अमावस्या उत्सवात सहभागी होण्यासाठी राजस्थानमध्ये मोठ्या संख्येने जातात.
यामुळे मोठ्या संख्येने लोक मतदानाकडे पाठ फिरवण्याची शक्यता होती. यामुळे हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा सहभाग कमी झाला असता,असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या हरियाणा शाखेने यापूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
भाजप हरियाणाचे अध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी २२ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात मतदानाची तारीख २८ ते २९ सप्टेंबर या आठवड्याच्या शेवटी आणि २ ऑक्टोबरला गांधी जयंतीसह वाढीव सुट्टीच्या कालावधीशी जुळण्याची चिंता व्यक्त केली होती.
या सलग सुट्टीमुळे अनेक रहिवासी बाहेरगावी किंवा सुट्टीवर असल्याने मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो, असा युक्तिवाद बडोली यांनी केला होता. हरियाणात मोठा मतदार असलेला बिश्नोई समाज राजस्थानमधील मुकाम गावाच्या वार्षिक यात्रेमुळे १ ऑक्टोबरला गैरहजर राहण्याची शक्यता आहे, याकडेही भाजपने लक्ष वेधले होते.
अशाच कारणांमुळे निवडणुकीच्या तारखा याआधी बदलण्यात आल्याच्या घटनांचा दाखला देत त्यांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडे मतदानाचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती.याआधी पंजाब विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी घोषित केलेली तारीख १४/ ०२/२०२२ (१६.०२.२०२२) रोजी संत रविदास जयंतीमुळे बदलून २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली होती.