Haryana Results : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या हरयाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांनी हरयाणाबाबत एक्झिट पोलनी वर्तवलेले अंदाज फेल ठरवले आहेत. हरयाणात सत्तांतराची आशा बाळगलेल्या काँग्रेसला धक्का बसला आहे. तिथं भाजपनं निर्णायक आघाडी घेत पुन्हा सत्ता राखण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे.
हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. शेकतरी व कुस्तीगीरांचा प्रदेश असलेल्या हरयाणात यावेळी भाजपची सत्ता जाईल, अशी हवा होती. एक्झिट पोल्सनीही तसाच अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसत आहे. एकूण ९० पैकी ८४ जागांवरील कल सध्या हाती आले असून त्यात भारतीय जनता पक्षानं ४८ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४८ जागांवर पुढं आहे. ही आघाडी मोडून काढणं काँग्रेससाठी कठीण असल्याचं दिसत आहे.
हरयाणाच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानंही जोर लावला होता. काँग्रेसशी आघाडीची चर्चा फिसकटल्यानंतर आम आदमी पक्षानं सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात केजरीवाल जामिनावर सुटल्यानंतर पक्षाचा उत्साह वाढला होता. मात्र, याचा काहीही उपयोग 'आप'ला झाल्याचं दिसत नाही. या पक्षाला एकाही जागेवर आघाडी घेता आलेली नाही.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत भाजप ४८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. इंडियन नॅशनल लोकदल एका जागेवर तर बसप एका जागेवर आघाडीवर आहे. चार अपक्ष उमेदवार आपापल्या जागांवर आघाडीवर आहेत.
हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
रोहतक जिल्ह्यातील गढी सांपला-किलोई मतदारसंघात काँग्रेसचे नेते भूपिंदर सिंह हुड्डा आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आघाडीवर आहेत.
भाजप नेते अनिल विज अंबाला कँट मतदारसंघातून आघाडीवर होते. इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते अभय सिंह चौटाला हे त्यांच्या ऐलनाबाद मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांचे चिरंजीव आदित्य सुरजेवाला हे कैथल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. हे सुरुवातीचे कल असून अंतिम निकाल बदलू शकतात.
संबंधित बातम्या