Haryana Election Result: हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या काळात पिछाडीवर पडलेल्या भाजपने मुसंडी मारत निवडणुकीत आघाडी घेतली आहे. भाजप बहुमताच्या आकड्या जवळ पोहोचला आहे. तब्बल ५० जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या बाबत यांनी आयोगाकडे लेखी तक्रार देखील केली आहे.
जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, हरयाणातील निकाल वेबसाईटवर हळूहळू अपडेट केल्या जात आहे. गेल्या दोन तासांपासून म्हणजेच सकाळी ९ ते ११ या कालावधीत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल अद्ययावत करण्याचे काम मंदावले आहे. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांना सत्य आणि अचूक माहितीसह वेबसाइट अद्ययावत करण्याच्या सूचना त्वरित द्याव्यात जेणेकरून खोट्या बातम्या पासरणार नाहीत.
दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल विज यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. निकाल बदलत असल्याने काँग्रेस रडीचा डाव खेळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॉंग्रेसची रडण्याची ही पद्धत आहे. ते अनेक प्रकारे रडतात. सकाळी ते म्हणत होते की, राहुल गांधींनी चमत्कार केला आहे. मात्र, आता त्यांनी त्यांचे वक्तव्य बदलले आहे. हा प्रकार म्हणजे रडण्याचा मार्ग आहेत. निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, "लोकसभा निकालाप्रमाणेच हरयाणातील निवडणुकीचे ट्रेंडही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाणीवपूर्वक हळूहळू शेअर केले जात आहेत. भाजप प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे का? हरियाणात दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपास सर्वच जागांवर ७-८ फेऱ्या झाल्या असून, त्यात भाजपने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे.
हरयाणा विधानसभेसाठी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुमारे २ तास काँग्रेस हरयाणात विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती. अनेक ठिकाणी आघाडीचा आकडा हा ६५ जागांपर्यंत पोहोचला होता. मात्र दहा नंतर आकडेवारीत मोठा बदल झाला. भाजपने पुनरागमन करत आघाडी घेतली. आयोगाच्या आकडेवारीनुसार, कालका, पंचकुला, यमुनानगर, लाडवा, करनाल, इंद्री, पानिपत शहर, पानिपत ग्रामीण, गोहाना, जींद, नरवाना , फतेहाबाद, दादरी, तोशाम आदी मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस, अंबाला शहर, नारायणगड, जगाधरी, कलाईत, कैथल, जुलाना, उचाना कलान, सिरसा आणि इतर काही ठिकाणी आघाडीवर आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देखील काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. निवडणूक आयोगाने मतमोजणीची आकडेवारी बराचवेळ अपडेट केलेली नाही. आमच्याकडे ग्राऊंडवरुन येणाऱ्या माहितीनुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल आहेत. अंतिम आकडेवारी येईल, तेव्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झालेले असेल.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनीही काँग्रेस जिंकेल, असा दावा केला. माध्यमांशी बोलताना गेहलोत म्हणाले, 'शेवटी विजय काँग्रेसचाच असेल. ही विचारसरणीची लढाई असून योग्य विचारसरणीचे लोक विजयी होतील. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना फक्त लोकांना त्रास कसा द्यायचा हे माहित आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांनी हरियाणात काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सरकार स्थापन करेल यात शंका नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सरकार स्थापन करणार यात शंका नाही. याचे श्रेय राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हरयाणाच्या जनतेला जाते, असेही ते म्हणाले.