देशभरात विजयादशमीची उत्साह असतानाच हरयाणामध्ये एक दु:खद घटना समोर आली आहे. कैथल जिल्ह्यात दसऱ्याच्या दिवशी मोठा अपघात झाला आहे. हरियाणातील कैथलमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. ९ जण या कारमधून प्रवास करत होते. दसऱ्यानिमित्त आयोजित बाबा राजपुरी जत्रेला ते जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार मुंदरी गावाजवळील कालव्यात कोसळली.
मुंदडी गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सिरसा शाखेच्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. कारचालकाची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी कैथल जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दर्शना (४०), सुखविंदर (२८), चमेली (६५), कोमल (१७), वंदना (१५), रिया (१२), रवनीत (६) आणि लवप्रीत (१३) अशी मृतांची नावे आहेत. मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून डीग गावचे रहिवासी आहेत. सर्वजण दसऱ्यानिमित्त बाबा लदाना यात्रेसाठी जात होते.
मुंदडी गावाजवळ पोहोचताच कारचे नियंत्रण सुटले आणि कार कालव्यात कोसळली. गाडी कालव्यात पडल्याचे पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. त्यांना वाचविण्यासाठी वाहनातील प्रवाशांनी कालव्यात उडी मारली. मोठ्या प्रयत्नानंतर गाडी बाहेर काढण्यात आली. त्याचबरोबर अनेक मृतदेह ही काढण्यात आले. दोघांना जिवंत बाहेर काढण्यात आले पण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. १५ वर्षीय मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. बचावपथक मृतदेहाचा शोध घेत आहेत. संपूर्ण कुटुंब कालव्यात बुडाले.
डीएसपी ललित कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ४ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे. एका मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. बचाव पथकाच्या वतीने बचावकार्य सुरू आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मृताच्या नातेवाइकांना पाठवली आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. प्रत्यक्षदर्शीव्यतिरिक्त रुग्णालयात दाखल कारचालकाचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या