Haryana Police Car Accident Video: हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील कुंडली सीमेजवळ सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास दिल्ली पोलिसांची कार धावत्या ट्रकला धडकली. या अपघातात दोन पोलीस निरीक्षक ठार झाल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, पोलिसांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागे असलेली पोलिसांची कार ट्रकला धडकली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत पोलीस निरीक्षकांची ओळख पटली आहे. पोलीस निरीक्षक दिनेश बेनिवाल आणि रणवीर असे अपघातात मरण पावलेल्या पोलिसांची नावे आहेत. दिनेश बेनिवाल हे उत्तर पश्चिम जिल्ह्यात स्पेशल स्टाफमध्ये तैनात होते. तर, रणवीर हे आदर्श नगर पोलीस ठाण्यात एटीओ म्हणून कार्यरत होते.
अपघाताबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दिनेश बेनिवाल हे २००९ बॅचचे अधिकारी होते. तर, रणबीर चहल हा २००८ बॅचचे अधिकारी होते. घटनेच्या वेळी दिनेश बेनिवाल कार चालवत होते. प्राथमिक तपासानंतर ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी कार ट्रकला धडकली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास सोनीपत येथील एनएच ४४ प्याऊ मणियारीजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही पोलीस निरीक्षकांना कारमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. खूप प्रयत्नानंतर त्यांना कारमधून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर दिल्ली पोलीस विभागात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा तपास सोनीपत कुंडली पोलीस करत आहेत. दोघेही मृत पोलीस निरीक्षक कामानिमित्त दिल्लीहून सोनीपतला जात असल्याची माहिती मिळाली आहे.