Sirsa varsity sexual harassment case : हरियाणातील सिरसा येथील चौधरी देवी लाल विद्यापीठातील सुमारे ५०० मुलींनी प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या संदर्भात पीडित मुलींनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आणि महिला आयोगाला पत्र लिहिले असून हे पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
या पत्रात त्यांनी दावा केला आहे की प्राध्यापक मुलींना त्यांच्या चेंबरमध्ये बोलवून लज्जास्पद कृत्य करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा घृणास्पद प्रकार सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी देखील मुलींनी केली आहे. मुलींच्या पत्राची दाखल घेऊन विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
रिपोर्टनुसार, मुलींनी प्राध्यापकाविरोधात पत्र लिहिण्याची ही चौथी वेळ आहे. याआधीही विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीने आरोपींना दोनदा क्लीन चिट दिली आहे. एएसपी दीप्ती गर्ग यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानंतर याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. ''या प्रकरणाची आधी आम्ही चौकशी करणार आहोत. या कालावधीत जे काही समोर येईल, त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
आरोपी प्राध्यापकाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व राजकीय दबावामुळे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, 'विद्यापीठाशी संबंधित काही कामात मी सक्रिय होतो, त्यामुळे मला टार्गेट केले जात आहे. माझ्याविरोधातील प्रत्येक चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. हा पूर्णपणे राजकीय हेतूने केलेल आरोप आहेत. रिपोर्टनुसार, या प्रकरणातील पहिले पत्र मुलींनी गेल्या वर्षी जूनमध्ये देखील पत्र दिले होते. हे पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवण्यात आले आहे. याबाबत विद्यापीठाकडून अंतर्गत चौकशी करण्यात आली, मात्र आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.