यूपीच्या हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कोठावण तालुक्यात कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने मृत महिलेच्या जागी अर्जदार पतीचा मृत्यू दाखला तयार करून दिला आहे. यावरून गावात खळबळ माजली असून पीडित पतीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्याने मृत्यूचा दाखला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीपत्रात करण्यात आला आहे.
अर्जदाराने म्हटले की, लाच म्हणून २ हजार रुपये देण्यास नकार दिल्यानंतर अधिकाऱ्याने मृत्यूचा दाखला देण्यास टाळाटाळ केली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या अनेक फेऱ्या मारायला लावल्या. त्यानंतर मृत पत्नीच्या जागी अर्जदार पतीचाच मृत्यूचा दाखला बनवला. स्वत:चा मृत्यू दाखला पाहून तक्रारदाराला धक्काच बसला. तक्रारीनंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. एडीओने पंचायतीकडून अहवाल मागवला आहे.
कोठावण ब्लॉकमधील अटवा येथील रहिवासी विश्वनाथ यांनी डीएम यांना दिलेल्या तक्रारीपत्रात म्हटले आहे की, त्यांची पत्नी शांती देवी यांचे १९ डिसेंबर २०२४ रोजी आजारपणामुळे निधन झाले होते. यासाठी त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांच्या ग्रामपंचायतीत तैनात असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी सरिता देवी यांच्याशी संपर्क साधला. सरिता देवीने मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पैसे न दिल्याने त्याला अनेक दिवस ताटकळत ठेवण्यात आले. त्याला मानसिक त्रास देण्यात आला. ३१ डिसेंबर रोजी मृत पत्नी शांती देवी यांचा मृत्यू दाखला बनविण्याऐवजी माजी सचिवांची डिजिटल स्वाक्षरी करून अर्जदाराचेच मृत्यू प्रमाणपत्र दिले. मृत्यूचा दाखला पाहून अर्जदाराला धक्का बसला.
याबाबत पीडिताने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तक्रार प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. डीएम म्हणाले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. त्यांनी एडीओकडून अहवाल मागितला आहे.
संबंधित बातम्या