hardik Pandya join BJP Fact check : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू असून सोशल मीडियातून वेगवेगळ्या चर्चा आणि बातम्या पसरत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यानं भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा या व्हिडिओच्या आधारे केला जात आहे. मात्र त्यामागचं सत्य वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.
'Indore Explorer' अकाउंटनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात हार्दिक पांड्या आणि गृहमंत्री अमित शहा एका व्यासपीठावर दिसत आहेत. अमित शहा हे हार्दिक पंड्याचं नाव घेताना दिसत आहेत. जय शहा यांनी हार्दिक पंड्याला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर अमित शहांनी त्याला भाजपमध्ये प्रवेश दिला, असं व्हायरल व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘तुम्हाला काय वाटतं?’ असंही या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओला जवळपास २० हजार लाइक्स मिळाले आहेत. बरेच लोक हे सत्य मानत आहेत. मात्र, हे खोटं असल्याचं शहानिशा केल्यानंतर समोर आलं आहे. हार्दिक पंड्यानं भाजपमध्ये प्रवेश केलेला नसून हा व्हिडिओ एका कार्यक्रमाचा आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि हार्दिक पंड्या सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या पुरते ते एकत्र होते.
हार्दिक पंड्या आणि अमित शहा यांचा हा व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यातील आहे. गुजरातमधील गांधीनगर इथं अमित शहा यांच्या हस्ते लोकसभा प्रीमियर लीगचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हार्दिकला आमंत्रित करण्यात आलं होतं. ही स्पर्धा गांधीनगरमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये खेळवण्यात आली होती. त्यावेळी हार्दिक आणि अमित शहा यांच्यात गप्पा-गोष्टीही झाल्या होत्या. खुद्द अमित शहा यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरून या कार्यक्रमाची माहिती दिली होती.
अहमदाबादमध्ये आज गांधीनगर लोकसभा प्रीमियर लीगचा शुभारंभ केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरात 'खासदार क्रीडा स्पर्धा' आयोजित केल्या जात आहेत. गांधीनगरच्या ७ विधानसभा मतदारसंघांमध्ये होणारी ही स्पर्धा राज्यात क्रीडा संस्कृती व आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देईल, असं अमित शहा यांनी त्यावेळच्या आपल्या सोशल पोस्टमध्ये नमूद केलं होतं.
संबंधित बातम्या