Cyclone Hamoon news Update : अरबी समुद्रानंतर आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ उग्र रूप धारण करत असून बुधवारी हे वादळ किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळाचा मोठा परिणाम देशातील काही राज्यांवर होणार आहे. आधी अरबी समुद्रात तयार झालेले 'तेज' चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला होता. मात्र, हे वादळ आता अरब देशांच्या दिशेने सरकले. मात्र, बंगालच्या उपसागरात 'हमून' वादळ तयार झाले असून या वादळाबाबत हवामान खात्याने मोठा अपडेट दिला आहे.
IMD ने या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले हमून चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेने सरकणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. सध्याच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ बांगलादेशच्या खेपुपारा आणि चितगाव किनारपट्टीला धडकेल. उद्या २५ ऑक्टोबरला दुपारनंतर हे वादळ किनार्याला धडक देणार आहे.
या चक्रीवादळाचा प्रभाव भारताच्या ईशान्य भागात दिसून येणार आहे. हवामान खात्याने मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे. आज मंगळवारी या राज्यात पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी (दि २६) पावसाचा जोर कमी होणार आहे, असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दक्षिण आसाम आणि पूर्व मेघालयात २४ आणि २५ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय ओडिशाच्या किनारपट्टीवरही या वादळाचा प्रभाव दिसून येईल. आज २४ ऑक्टोबर रोजी या राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हमूनमुळे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये जोरदार वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रति तास असू शकतो. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मंगळवारी सकाळपासून जोरदार वारे वाहतील. बांगलादेशच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
मिझोराम आणि त्रिपुरामध्येही ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. आसाम आणि मणिपूरमध्येही वाऱ्याचा वेग सारखाच राहील. मात्र, या चक्रीवादळाचा उत्तर भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाही. उत्तर भारतात ढगांची हालचाल सुरू राहील. अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडू शकतो.
संबंधित बातम्या