israel hamas war : पॅलेस्टाईनमध्ये कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च कमांडर इस्माईल हनीये मारला गेला आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभातून परतत असताना मंगळवारी इराणमध्ये त्यांची हत्या झाली. इराणच्या आर्मी रिव्होल्युशनरी गार्ड्सने या बाबत निवेदन जारी करून या घटनेला दुजोरा दिला आहे. इस्माईल यांची हत्या झाल्याचे हमासने म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही पॅलेस्टाईन व अरब देशाच्या लोकांना अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो की हमासच्या राजकीय शाखेचा नेता इस्माइल याचा मृत्यू झाला आहे. तेहरानमध्ये त्याच्या लपून बसलेल्या इस्रायलच्या हेरांनी ठार मारले. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभातून परतत असताना ही घटना घडली.
इस्माईल हनियेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात त्यांचे काही सुरक्षा रक्षक देखील मारले गेले आहेत. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी इस्माईल हनीये तेहरानला पोहोचले होते. त्याचबरोबर इस्रायलने इस्माईल लपून असलेल्या ठिकाणावरही हवाई हल्ला केल्याचा दावा हमासने केला आहे. हमासने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे १२०० इस्रायली मारले गेले. याशिवाय २५० लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. तेव्हापासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे.
इस्माईलची हत्या ही इस्रायलसाठी मोठे यश मानले जात आहे. इतकंच नाही तर इराणसाठीही हा मोठा धक्का मानला आहे. कारण इराणच्या राजधानीत इस्माईलची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आता इराणच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हमासला इराण समर्थित दहशतवादी संघटना मानली जाते.
एवढेच नाही तर लेबनॉनस्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने नुकतेच इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्लाही केला होता. या हल्ल्यात १२ मुलांचा मृत्यू झाला होता. ही मुले फुटबॉल खेळत असतांना एक क्षेपणास्त्र मैदानात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. हिजबुल्लाला इराणचाही पाठिंबा आहे. अशा स्थितीत इस्माईलला इराणमध्येच ठार करून इस्रायलने इराण आणि हमाससह इतर शत्रूंना देखील मोठा संदेश दिला आहे.