Israel Hamas News : इस्रायल आणि हमास यांच्यात दीड वर्षाच्या युद्धानंतर युद्धबंदी घोषित करण्यात आली होती. या युद्धबंदीमुळे गाझामधील जनतेला काहीसा दिलासा मिळाला असला तरी स्मशानभूमी बनलेल्या शहरात जीवनाच्या शोधात असलेल्या गाझावासीयांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. शस्त्रसंधीअंतर्गत कैदी आणि बंधकांची देवाणघेवाण होत असताना हमासने सोमवारी अचानक इस्रायलच्या बंधकांची सुटका करणार नसल्याचे जाहीर केले. हमासच्या या घोषणेनंतर इस्रायलही संतापला आहे. संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला पुडील कारवाईसाठी सज्ज राहण्यास सांगून गाझामध्ये मोठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायली बंधकांची सुटका करणार नसल्याचे सोमवारी जाहीर केले. इस्रायलने ही घटना म्हणजे शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन असल्याचं म्हटलं असून हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या बाबत इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, हमासने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले आहे आणि इस्रायली समुदायांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी गाझामधील लष्कराला कारवाई करण्याच्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हमासच्या लष्करी शाखेचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी आरोप केला की, १९ जानेवारीपासून शस्त्रसंधी लागू होऊनही इस्रायलने विस्थापित पॅलेस्टिनींना उत्तर गाझामध्ये परत येण्यात अडचणी आणल्या आहेत. गाझामध्ये लष्करी हल्ले केले आहेत आणि मदत सामग्री चे वितरण थांबवले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून शस्त्रसंधी कायम असली तरी इस्रायलच्या गोळीबारात काही घटनांमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मदत करणाऱ्या संस्थांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रसंधीनंतर गाझाला मानवतावादी मदतीचा पुरवठा वाढला आहे.
जोपर्यंत इस्रायल आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करत नाही आणि मागील आठवड्यांची पूर्तता करत नाही तोपर्यंत हमास आणखी बंधकांची सुटका करणार नाही, असे अबू उबैदाने म्हटले आहे. इस्रायली बंधक आणि पॅलेस्टिनी कैद्यांची देवाणघेवाण करण्याची आणखी एक प्रक्रिया शनिवारी होणार होती.
शस्त्रसंधीमुळे गाझातून पलायन केलेल्या नागरिकांनी पुन्हा आपल्या घरी येण्यास सुरुवात केली होती. आपली तुटकी फुटकी घरे शोधून पुन्हा संसार थाटण्याचा प्रयत्नात होते. मात्र, हमासने शस्त्र संधीचे पालन न केल्याने आता युद्ध आणखीभडकणार असल्याचं दिसत आहे.
संबंधित बातम्या