Israel-Hamas war news : इस्त्रायली सैन्याने रफाहमध्ये हल्ले सुरू केल्यानंतर हमास नरम पडला आहे. हमासच्या नेत्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हमासचे नेते इस्माईल हनीये यांनी सोमवारी कतार आणि इजिप्तला त्यांची पॅलेस्टिनी संघटना युद्धविराम प्रस्ताव स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. गाझामध्ये युद्धबंदीसाठी इस्रायल आणि हमासमध्ये कतार आणि इजिप्त मध्यस्थी करत असून इजिप्तची राजधानी कैरो येथे याबाबत चर्चा सुरू होती.
इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टिनींना गाझा येथील रफाह शहर रिकामे कारंयस संगितले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॅलेस्टिनीं आसरा घेतला आहे. यानंतर मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिक जिवाच्या भीतीने आपली घरे सोडून निघून जाऊ लागली आहे. इस्रायलने रफाहच्या सीमेवर रणगाडे उभे केले आहेत. त्याचवेळी हमासने इस्रायलला धमकी ही दिली होती. याआधीही हमासने इजिप्तमध्ये युद्धविराम प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, हमासने शालोम क्रॉसिंगवर हल्ला केल्याने युद्धविरामाची चर्चा इस्रायलने फेटाळली होती. हमासच्या हल्ल्यात चार इस्रायली सैनिक ठार झाले होते.
हमासने युद्धविराम करार स्वीकारण्याच्या मुद्द्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमास ज्या कराराबद्दल बोलत आहे त्याला इस्रायलची मान्यता नाही. हमास जर इस्रायलच्या अटी मान्य करण्यास तयार नसेल तर अशा स्थितीत रफाहमधील हल्ले थांबणार नाही. रफाहमध्ये इस्रायल लष्कराच्या कारवाया सुरूच राहतील असेही नेतन्याहू म्हणाले.
हमासचे राजकीय ब्युरोचे प्रमुख इस्माइल हनीये यांनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी आणि इजिप्तचे गुप्तचर मंत्री अब्बास कमाल यांना सांगितले की, हमास युद्धविराम कराराचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहे. राफाच्या लोकांना सोमवारपूर्वी निघून जाण्याचे आदेश इस्रायलने दिले होते. इस्त्रायली लष्कराने म्हटले होते की पॅलेस्टिनींनी अल मवासीमध्ये तयार केलेल्या सुरक्षित भागात जावे, जेणेकरुन रफाहमध्ये कारवाई करताना ते सुरक्षित राहतील.
इस्रायलने रफाह रिकामे करण्यास सांगितले होते. मात्र, अमेरिकेने इस्रायलच्या या भूमिकेला समर्थन दिले नाही. गाझामधील दक्षिणेकडील रफाह शहर रिकामे करण्यासाठी तसेच निर्वासितांना आधार देण्यासाठी कोणतीही योजना तयार करण्यात आलेली नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. पॅलेस्टाईनच्या गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ३४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ७८००० लोक जखमी झाले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल हमस युद्ध सुरू झाले. हमासच्या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरिक मारले गेले तर हमासने ३५३ लोकांना ओलीस ठेवले होते.
संबंधित बातम्या