येत्या काही दिवसांत चीनमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या स्पर्धेची चांगलीच चर्चा रंगली आहे. चीनमध्ये दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या संख्येने आयोजित केले जातात, पण यावेळी विजेत्यांना मिळालेल्या विचित्र बक्षिसांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा कार्यक्रम २९ डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून गाय देण्यात येणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या धावपटूंना मासे व रानकोंबड्या मिळणार आहेत. या विचित्र बक्षिसामागचे कारणही समोर आले आहे.
चिनी अॅथलेटिक्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये अलीकडच्या काळात मॅरेथॉनच्या आयोजनात वाढ झाली आहे. २०२३ मध्ये देशभरात एकूण ६२२ मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात दररोज सरासरी दोन मॅरेथॉन होत्या. ही हाफ मॅरेथॉन २९ डिसेंबर रोजी चीनच्या ईशान्येकडील जिलिन प्रांतात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मिळालेली बक्षिसे चर्चेत आहेत.
अधिकाधिक लोकांना मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे आणि स्थानिक उत्पादनाला चालना देणे हा अशा बक्षिसांच्या घोषणेमागचा उद्देश असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. हाफ मॅरेथॉनमधील पुरुष आणि महिला विजेत्यांना गाय देण्यात येणार असल्याचे नोंगन ताईपिंगची आइस अँड स्नो हाफ मॅरेथॉन आयोजकांनी सांगितले. बक्षीस म्हणून गायीची देवाणघेवाण 6,000 युआन ($ ८२७.८१) मध्ये केली जाऊ शकते.
दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ताईपिंग तलावातील मासे, तर अन्य विजेत्यांना त्याच तलावातील हंस, बदक व कोंबड्या पारितोषिके म्हणून दिली जातील. इतर विजेत्यांना दहा किलो तांदूळ आणि गहू मिळेल. बक्षिसांच्या या घोषणांची चीनमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एका युजरने गमतीने म्हटले आहे की, जर प्रथम क्रमांकाची व्यक्ती परदेशात राहत असेल तर तुम्हालाही जनावरे नेण्यासाठी परदेशात जाण्याचे तिकीट दिले जाईल का?
शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये २ ते ३ नोव्हेंबर दरम्यान ३० हून अधिक मॅरेथॉन आणि इतर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात सुमारे ४,००,००० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
संबंधित बातम्या