सौदी अरेबिया उमराह आणि हज यात्रेकरूंच्या नावावर आपल्या देशात येत असलेल्या पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येने चिंतित आहे. पाकिस्तानातून मोठ्या संख्येने नागरिक धार्मिक यात्रेसाठी सौदीत येतात. मात्र येथे आल्यानंतर ते भीक मागण्यास सुरुवात करतात. पाकिस्तानी भिकाऱ्यांची वाढती संख्येकडे सौदी अरेबियात मोठी समस्या म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानाला भिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं आहे. जर तुम्ही यावर नियंत्रण आणलं नाही तर पाकिस्तानी हज आणि उमराहच्या यात्रेकरुंवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असा इशाराही दिला आहे. यावर नियंत्रण न आणल्यास निर्बंध आणण्याचा इशारा दिला आहे.
उमराहच्या नावाखाली आपल्या देशात येणाऱ्या पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर सौदी अरेबियाने चिंता व्यक्त केली आहे. त्यांना आखाती देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानने कारवाई करावी, अशी मागणी सौदी अरेबियाने केली आहे. मंगळवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली.
पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने 'एक्सप्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार, सौदीच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पाकिस्तानातील उमराह आणि हज यात्रेकरूंवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सौदी हज मंत्रालयाने पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाला इशारा देत उमराह व्हिसाअंतर्गत पाकिस्तानी भिकाऱ्यांना आखाती देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी कारवाई करण्याची विनंती केली आहे. या इशाऱ्यानंतर पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने 'उमराह कायदा' आणण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा उद्देश उमराहची व्यवस्था करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींचे नियमन करणे आणि त्यांना कायदेशीर देखरेखीखाली आणणे आहे.
यापूर्वी सौदी अरेबियाचे राजदूत नवाफ बिन सईद अहमद अल-मलिकी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी त्यांना आश्वासन दिले होते की, सौदी अरेबियात भिकारी पाठवणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई केली जाईल. पाकिस्तानी भिकारी उमराच्या वेशात आखाती देशात जातात. बहुतेक लोक उमरा व्हिसावर सौदी अरेबियात जातात आणि नंतर भीक मागण्याशी संबंधित क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असतात.
पाकिस्तानने २ हजार भिकाऱ्यांचे पासपोर्ट ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन ते जगभरात कुठेही जाऊ शकणार नाहीत. गेल्या महिन्यात सौदीला जाणाऱ्या एका विमानातून ११ कथित भिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं होतं. चौकशीदरम्यान आपला भीक मागण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं