वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरातील व्यास जी तहखान्यात पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर तहखान्यातील पूजाविधीचे फोटो समोर आले आहेत. १९९३ नंतर पहिल्यांदाच म्हणजे ३० वर्षांनी येथे पूजा करण्यात आली. बुधवारी वाराणसी जिल्हान्यायालयाने हिंदू पक्षकारांना मोठा दिलासा देत ज्ञानवापीच्या तहखान्यात असलेल्या व्यासजी मंदिरात पूजा करण्याची परवानगी दिली गेली. त्यानंतर बुधवारी रात्रीचच (३१ जानेवारी) भाविक ज्ञानवापी मंदिर परिसरात पोहेचले व रात्री पूजा केली गेली.
वाराणशी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हिंदू पक्षकारांना दिलासा देतपूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली आहे.यानंतर ज्ञानवापीतीलबॅरिकेड्स हटवण्यात आले व रात्री साडे बारा वाजता काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पूजा केली.
यानंतर आता ज्ञानवापीत ८ देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, आरती व पूजन विधीचे वेळापत्रक तयार केले आहे.ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर रात्री तळघर खुले करण्यात आले. यानंतर पंचगव्य करत तळघराची शुद्धी करण्यात आली. रात्री २ वाजता षोडषोपचार करत पूजन विधींना सुरुवात करण्यात आली. ज्ञानवापीत सुमारे पहाटे ३.३० वाजल्यापासून ते रात्री १०.३० वाजेपर्यंत दिवसभरात ५ वेळा आरती करण्यात येणार आहे.