ज्ञानवापी मशीदीवरून देशातील वातावरण ढवळून निघाले असताना व यानिमित्त हिंदू व मुस्लिम पक्षकार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असताना आता, ही मशीद किंवा मंदिर नाही तर बौद्ध मठ आहे, असा दावा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून करण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदी प्रकरणी सुनावणी करताना आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने एएसआयला ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. २१ जुलै रोजी वाराणशी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या एएसआय सर्वेच्या निकालाविरोधात मुस्लिम पक्षाने सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार हायकोर्टात धाव घेतली होती. आता कोर्टाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. मात्र ज्ञानवापी ही मशीद किंवा मंदिर नाही तर बौद्ध मठ आहे, असा दावा करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
ज्ञानवापीच्या एएसआय सर्वेला परवानगी दिली असताना आता या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला आहे. सर्वोच्च न्यायालयात धाव घेत बौद्ध धर्मगुरूंनी हा त्यांचा मठ असल्याचा दावा केला आहे. बौद्ध धर्मगुरूंनी सुप्रीम कोर्टात रीट याचिका दाखल केली असून यामध्ये ज्ञानवापी ही मंदिर किंवा मशीद नसून बौद्ध मठ असल्याचे म्हटले आहे. याबाबत बौद्ध धर्मगुरू सुमित रतन भंते यांनी केलेल्या दाव्यानुसार देशामध्ये अनेक अशी मंदिरे आहेत जी बौद्ध मठ पाडून बांधण्यात आलेली आहेत. ज्ञानवापी मशिदीमध्ये आढळलेले त्रिशूळ आणि स्वस्तिक चिन्ह ही बौद्ध धर्माची आहेत. तसेच केदारनाथ किंवा ज्ञानवापीमध्ये ज्यांना ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला जात आहे ते बौद्ध स्तूप आहेत. ज्ञानवापी मशीद मंदिर नाही तर बौद्ध स्तूप आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
सुमित रतन भंते यांनी सांगितले की, देशभरामध्ये बौद्ध मठांचा शोध सुरू केला आहे, देशात जैन आणि बौद्ध मठांना तोडून मंदिर किंवा इतर धार्मिक स्थळे बांधण्यात आली आहेत, अशा स्थळांचा आम्ही शोध घेत आहोत. सर्व मंदिर आणि मशिदी त्यांच्या मूळ रूपात आल्या पाहिजेत. जिथे जिथे बौद्ध मठांचं स्वरूप बदलण्यात आलं आहे, तिथे बौद्ध मठ हे मूळ रूपात आणले पाहिजेत. बौद्ध धर्माच्या अनुयायांचही हेच मत आहे, असा दावा त्यांनी केला.