मध्य प्रदेशमधून एक अजब घटना समोर आली आहे. एका म्हशीने नवीन रस्त्यावर शेण टाकल्यामुळे चक्क त्या म्हशीच्या मालकाला ९ हजार रुपये दंड ठोठावल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका म्हशीच्या मालकाला शेणासाठी नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शेण रस्त्यात आढळल्यानंतर पालिकेच्या पथकाने म्हैस जप्त केली. म्हशीने रस्त्यातच शेण केल्याने मालकाला दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर नऊ हजार रुपयांचा दंड भरून म्हैस मालकाला परत करण्यात आली.
ग्वाल्हेरमध्ये स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. शहरात अनेक ठिकाणी पशुपालक रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधतात. याबाबत त्यांना इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी सिरौल रोडजवळ वाटेत एक म्हैस आढळून आली, म्हशीने तेथे शेणही टाकलं होतं.
रस्त्यावर शेण आढळल्यामुळे पालिकेच्या पथकाने म्हैस ताब्यात घेतली. त्यानंतर मालक नंदकिशोर यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. दंड वसूल झाल्यानंतरच म्हैस त्याला परत करण्यात आली. यापूर्वी ग्वाल्हेर महानगरपालिकेने रस्त्यावर शेण केल्यामुळे जनावरांच्या मालकांना मोठा दंड ठोठावला होता. डिसेंबर २०२० मध्ये एका म्हशीच्या मालकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
ग्वाल्हेर महानगरपालिकेच्या पथकाने शहरात कचरा टाकणाऱ्या म्हैस मालक आणि इतर अनेकांकडून दंड वसूल केला. या पथकाने गुरुवारी वेगवेगळ्या लोकांकडून एकूण ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील एका डेअरी ऑपरेटरला २०२० मध्ये स्वच्छ केलेल्या रस्त्यावर म्हशीचे शेण सापडल्याबद्दल शहर महापालिका प्राधिकरणाने १०,००० रुपयांचा दंड ठोठावला होता. डेअरी ऑपरेटर आणि म्हशींच्या मालकावर ग्वाल्हेर महानगरपालिकेने स्वच्छ शहराच्या रस्त्यावर जनावरांचे शेण जमा केल्याबद्दल हा दंड आकारला होता.
ग्वाल्हेर महापालिकेकडून म्हशीच्या मालकाला ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेची रिसीटही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. महापालिकेकडून एका नवीन रस्त्याचं काम सुरू असतानाच बेताल सिंह नावाच्या डेअरी मालकाच्या एका म्हशीने रस्त्यावर घाण केली. नेमके त्याचवेळी रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालिकेचे आयुक्त या ठिकाणी आले. नव्या रस्त्यावर म्हशीचे शेण पडल्याचे पाहून त्यांनी म्हशीच्या मालकाला दंड करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.