Cyber Crime: 'हे' शहर सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर; सहा महिन्यात २०००० गुन्हे; आतापर्यंत २८५ कोटींची फसवणूक-gurugram on target of cyber criminals 20 thousand crimes and rs 285 crores fraud in 6 month ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cyber Crime: 'हे' शहर सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर; सहा महिन्यात २०००० गुन्हे; आतापर्यंत २८५ कोटींची फसवणूक

Cyber Crime: 'हे' शहर सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर; सहा महिन्यात २०००० गुन्हे; आतापर्यंत २८५ कोटींची फसवणूक

Sep 10, 2024 09:52 AM IST

Cyber fraud: सायबर गुन्हेगारीच्या घनटेत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सायबर गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ
सायबर गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ (HT_PRINT)

Cyber Crime News: हरियाणातील गुरुग्राममध्ये सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या सहा महिन्यांत सायबर फसवणुकीच्या २० हजार घटना घडल्या आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगारांनी सुमारे २८५ कोटी रुपयांची फसवणूक केली. यापैकी सुमारे १६ हजार प्रकरणे सोडवल्याचा दावा गुरुग्राम पोलिसांनी केला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ४५ कोटी रुपयेच वसूल करण्यात आले आहेत. पोलिसांनी फसवणुकीचे ५९७ गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत ७८८ जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, २०२१ मध्ये सायबर फसवणुकीची सुमारे ११ हजार प्रकरणे पोलिसांकडे नोंदवली गेली, ज्यात सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या कालावधीत सुमारे ६ कोटी ८२ लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यापैकी ६ कोटी ४९ लाख रुपयांची वसूली करण्यात आली आहे. या कालावधीत १३१ सायबर गुन्हेगार पकडण्यात आले. त्यानंतर २०२२ मध्ये सायबर गुन्हेगारांनी जवळपास १८ हजार लोकांना लक्ष्य केले आणि त्यांच्याकडून सुमारे १०९ कोटी रुपये उकळले. या प्रकरणी पोलिसांनी ३३५ जणांना अटक केली. सर्व घटनांची उकल झाली असली तरी या गुन्हेगारांकडून केवळ ४ कोटी ७९ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक

महत्त्वाचे म्हणजे, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये फसवणुकीच्या घटना दुप्पट झाल्या आहेत. गेल्यावर्षी सायबर गुन्हेगारांनी सुमारे ३३ हजार लोकांना आपल्या जाळ्यात फसवले. या प्रकरणाती सर्व गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फसवणूक करणाऱ्यांनी स्वत:ला दिल्ली, मुंबई आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली.

'अशी' केली जाते फसवणूक

मूळचा जींदमधील नरवाना येथील बेलरखा गावचा रहिवासी असलेला शैलेंद्र सध्या सुशांत लोक २ च्या एच ब्लॉकमध्ये राहतो. त्याने पोलिसांना सांगितले की, १ जून रोजी त्याला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एक मेसेज आला, ज्यामध्ये जाहिरातीला स्टार रेटिंग देण्याच्या नावाखाली पैसे कमविण्यास सांगितले होते. रस दाखवल्यानंतर त्याला टेलिग्रामवर ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आले. मात्र, १ जून ते ३ जून या कालावधीत तरुणाच्या खात्यातून ६ लाख २९ हजार रुपये गायब झाले, आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेतली

कोणती काळजी घ्यावी?

सहायक उपायुक्त प्रियांशु दिवाण म्हणाले, 'खबरदारी घेतल्यास सायबर फसवणुकीला आळा बसू शकतो. अधिक कमाईचे आमिष दाखवून कुणाला फोन आला तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तुमची बँक खाती, एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही देऊ नका. कायद्यात डिजिटल अटकेची तरतूद नाही. अशा वेळी घाबरण्याचे कारण नाही. असा फोन आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

 

पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे अनोळखी व्यक्तीने सांगितल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

● एखाद्या अनोळखी व्यक्तीने ग्रुपमध्ये अॅड केल्यास त्याला कारण विचारा.

● जर कोणी अल्पावधीत भरघोस नफ्याचे आश्वासन देत असेल तर सावध व्हा.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर सेलच्या १९३० आणि १५५२६० या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सायबर फसवणुकीची तक्रार करता येईल. २४ तासांच्या आत फसवणुकीची तक्रार केल्यास रक्कम परत मिळणे अपेक्षित आहे. पोलिस पैसे गोठवतात आणि कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत रक्कम परत करतात.

Whats_app_banner
विभाग