डेरा सच्चा सौदा संस्थेचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची एका खून प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. डेरा सच्चा सौदा संस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत रणजीत सिंह यांची १९ वर्षांपूर्वी १० जुलै २००२ रोजी हरियाणातील कुरुक्षेत्रमधील खानपूर कोलियां गावात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात गुरमीत राम रहिमकडून महिलांचे लैंगिक शोषण कसे केले जात आहे, हे सांगणारे पत्र प्रसारित करण्यात रणजीत सिंह यांच्या कथित भूमिकेमुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. २०२१ साली केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने गुरमीत राम रहीम आणि इतर चौर आरोपींना रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
याप्रकरणी आज पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहसह इतर चौघांना रणजित सिंह हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती राम रहीमच्या वकिलांनी पत्रकारांना दिली. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम यांच्याव्यतिरिक्त अवतार सिंह, जसबीर सिंग, सबदिल सिंग आणि कृष्ण लाल हे या प्रकरणातील अन्य आरोपी होते. या सर्व आरोपींवर भादंविच्या कलम १२० बी सह भादंवि कलम ३०२ आणि कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि कलम १२० बी अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते.
गुरमीत राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाच्या आश्रमात सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांची माहिती रणजीत सिंह यांनी एक निनावी पत्र प्रसारित करून चव्हाट्यावर आणला होता, असं बोललं जात आहे. या निनावी पत्राच्या मजकुरात राम रहीमवर गंभीर आरोप होते. आश्रमात राहणाऱ्या साध्वींचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला होता. याच पत्राचा वापर सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी एका वृत्तात केला होता. छत्रपती यांच्या वृत्तामुळे अनेक तपास यंत्रणांचे लक्ष वेधले गेले होते. त्यानंतर छत्रपती यांची सुद्धा त्यांची हत्या करण्यात आली होती. पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणात गुरमीत राम रहीमला कोर्टाने दोषी ठरवण्यात आले असून सध्या शिक्षा भोगत आहे.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम याच्यावर त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून तो हरियाणातील रोहतक येथील सुनारिया कारागृहात कैद आहे.
संबंधित बातम्या