गुजरातमधील बडोद्यात शुक्रवारी एका खासगी शाळेची भिंत कोसळल्याने सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. लंच ब्रेकमध्ये वर्गात बसून विद्यार्थी जेवण करत असतानाच शाळेची भिंत कोसळल्याने जवळपास ६ विद्यार्थी जखमी झाले. भिंत कोसळतानाची घटना क्लासमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बडोद्याच्या वाघोडिया परिसरात असणाऱ्या श्री नारायण विद्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास लंच ब्रेक सुरू होता. दरम्यान क्लासरूमची एक भिंत अचानक कोसळली. या घटनेत सहा विद्यार्थी बेंचसह भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले. विद्यार्थी किरकोळरित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बडोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शाळेची इमारत खुपच जुनी व जीर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. बडोद्यातील श्री नारायण शाळेतील पहिल्या मजल्यावरील वर्गाची भिंत कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शाळेचे निरीक्षण केले.
ही घटना घडताच शाळा प्रशासनाने या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला दिली. अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू केले. तसेच जखमी विद्यार्थांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.
प्राचार्य रूपल शाह यांनी म्हटले की, दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली.मोठा आवाज झाल्याने आम्ही घटनास्थळी धावलो. एका विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. जेवणाची सुट्टी झाल्याने अनेक विद्यार्थी वर्गातून बाहेर गेले होते.
स्थानिक नागरिक संस्कृती पांड्या य़ांनी सांगितले की, शाळेची इमारत १४ ते १५ वर्षे जुनी आहे. स्थानिक नागरिकांनी मुलांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. शाळेच्या व्यवस्थापनास इमारत जुनी असल्याचे माहिती असूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. शाळा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे आणि कागतपत्रे असल्याचा दावा केला जात आहे.या घटनेत भिंतीला लागून असलेल्या १२ ते १३ सायकलींचेही नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या