Viral News: गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यादरम्यान, अकोटा स्टेडियम परिसरात पाणी शिरले असून एका घराच्या छतावर मगर दिसल्याचा व्हिडिओ पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.
गुजरातमध्ये काही दिवसांतच सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (एसईओसी) सांगितले की, सौराष्ट्र क्षेत्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषत: देवभूमी द्वारका, जामनगर, पोरबंदर आणि राजकोटमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्याच्या पथकांच्या बचाव पथकाने वडोदरा शहराभोवती घरे आणि छतावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यासाठी भारतीय लष्कराच्या तीन तुकड्याही तैनात करण्यात आल्या.
या पुरात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक विस्थापित झाले आहेत. द्वारकेत अग्निशमन दलाने पूरग्रस्त भागातून आठ जणांना वाचवले. द्वारकेतील चरकाळा रोड, अवदपाडा एक्सटेंशन मध्ये हे लोक अडकले होते. विश्वामित्री नदीचा किनारा ओलांडून रहिवासी क्षेत्रात शिरल्याने बडोद्याच्या काही भागांतील अनेक सखल भागांना पुराचा सामना करावा लागला.
देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभालिया तालुक्यात बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४५४ मिमी, जामनगर शहर (३८७ मिमी) आणि जामजोधपूर तालुक्यात ३२९ मिमी पावसाची नोंद झाली. याच कालावधीत राज्यातील २५१ तालुक्यांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर ३९ तालुक्यांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. राज्यातील १४० जलाशये आणि धरणे आणि २४ नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. तर, २०६ पैकी १२२ धरणे हाय अलर्टवर आहेत.
गुजरातमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सौराष्ट्र-कच्छच्या सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, पोरबंदर, जुनागड, अमरेली, भावनगर, मोरबी, द्वारका, गिर सोमनाथ, बोटाड, कच्छ आणि दीवमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुजरात उद्या म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी हवामान खात्याने गुजरातमधील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, पोरबंदर, जुनागड, अमरेली, भावनगर, मोरबी, द्वारका, गिर सोमनाथ, बोटाड, कच्छ आणि दीवसह सौराष्ट्र-कच्छच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण गुजरातमधील भरूच, सुरत, डांग, तापी, नवसारी, वलसाड आणि दमण आणि दादरा नगर हवेलीतील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.